मागील वर्षीपासून शासनाने ई-पीक पाहणीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु ई-पीक पाहणी अॅपच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणी करून शकलेले नाहीत. १ जुलैपासून ई- पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे.
पेरणीची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यासाठी सरकारने ई-पीक पाहणी अॅप विकसित केले आहे. मात्र आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नेटवर्कची अडचण निर्माण झाली असल्याने अनेक शेतकरी पिकांची नोंद करू शकले नाही. ई-पीक पाहणी कशी करावी याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसल्याने त्यांना इतरांची मदत घेऊन नोंदणीचे काम पूर्ण करावे लागत आहे.
शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. पीक विमा काढल्यानंतर मिळण्यासाठी देखील नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. जुलै महिन्यापासून ई-पीक पाहणीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंत. यंदा कमी पावसामळे शेतकऱ्यांच्या पेरण्या विलंबाने झाल्या. याचा परिणाम पिकांच्या नोंदणीवर झाला आहे.
९ महसूल मंडळात पेरणी
- अंबड तालुक्यातील १२ हजार ९२९ पीक पाहणी खातेदारांची संख्या आहे. यात १४ लाख ८५६ हेक्टर क्षेत्र आहे. अंबड तालुक्यात यंदा खरीप हंगामात ९० हजार २७० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
- अंबड तालुक्यात १३८ गावे असून, ९ महसूल मंडळात ८५ हजार ५४७ क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख १५ हजार ६३ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे.
किचकट प्रक्रिया
शेतकऱ्यांना पीक पेरा अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत. अॅपचे सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने नोंदणी होऊ शकलेली नाही. तसेच नोंदणी करण्याची किचकट प्रक्रिया, मोबाइल नेटवर्क नसणे अशा अनेक अडचणी निर्माण होत आहे. अनेक शेतकरी या प्रक्रियेबाबत अज्ञानी असल्याने ई-पीक नोंदणीपासून असे शेतकरी वंचित आहेत. - दादासाहेब लटपटे, शेतकरी.
खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. नोंदणीसाठी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - चंद्रकांत शेळके, तहसीलदार, अंबड