मच्छिंद्र देशमुखधामणगाव पाट: महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक 'ई पीक पाहणी' नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महसूल विभागाच्या मदतीने पाच दिवसांत ८० टक्के शेतकऱ्यांची 'ई पीक पाहणी' केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात धामणगाव पाट हे आदिवासी आणि दुर्गम भागातील गाव आहे गावात तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या. गावात १३५८ हेक्टर शेती क्षेत्र आहे.
महसूल दप्तरी १२०० (एक हजार दोनशे) खातेदार आहेत. दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात गावातील तलाठी कार्यालयात दहा टक्के शेतकरी पीक नोंदणी करत होते.
या गावात २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान कोतूळ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर आयोजित केले होते.
या गावात शेतकऱ्यांना मोबाईलवर स्वतःची ई पीक नोंदणी करता येत नाही हे लक्षात आले. प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व सर्व प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना हे ॲप स्वतः वापरायला शिकवायचे हा निर्णय घेतला.
या शिबिरात पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि दहा शिक्षकांनी धामणगाव पाट येथील तलाठी अतुल तिकांडे, पोलीस पाटील लक्ष्मण चौधरी यांच्या कडून 'ई पीक पाहणी' ॲप चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
पन्नास विद्यार्थी व दहा शिक्षक यांनी दहा गट तयार करून गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन ई पीक पाहणी करवून घेतली. तर प्रत्येक शेतकरी कुटुंबात मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून चालवायला शिकवले.
पाच दिवसांत १ हजार दोनशे पैकी ९२६ म्हणजे ८० टक्के शेतकऱ्यांनी ई पिक नोंदणी केली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालक यांनी १४ जानेवारीला सर्व राष्ट्रीय सेवा योजना युनिटला ग्रामीण भागात अशी ई पिक पाहणी करण्याचा अध्यादेश काढला आहे.
ही संकल्पना कोतूळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय ताकटे यांच्याकडे शिबिर नियोजन बैठकीत मांडली, कार्यक्रम अधिकारी प्रा. अरूण वाकचौरे, व सर्व प्राध्यापकांनी तलाठी कार्यालय धामणगाव पाट, सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील तरुण शेतकरी यांची मदत घेतली.
सध्या धामणगाव पाट येथील पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी नोंदणी ॲप डाऊनलोड आहे. ते स्वतः चालवतात व इतरांना मदत करतात. कोतूळ येथील संत कोंडाजीबाबा कला वाणिज्य महाविद्यालयाचे साठ प्रशिक्षित विद्यार्थी हे स्वतः वापरतात आसपासच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतात.
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे महसूल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी आदिवासी क्षेत्रातील दुर्गम गावात ८० टक्के ई पीक पाहणी केली. ही महसूल विभागाच्या दृष्टीने ही दिशादर्शक बाब आहे. - सिध्दार्थ मोरे तहसीलदार अकोले
राष्ट्रीय सेवा योजना लोकांना त्यांच्या परिसरात काय गरजेचे आहे हे पाहून काम करते. केवळ गावाची स्वच्छता या पेक्षा ग्रामीण भागाच्या जिवनाशी निगडित अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यात सर्पदंश व लस या बाबत जनजागृती झाली. कोतूळ महाविद्यालयाच्या एन एस एस युनिटने शेतकऱ्यांसाठी केलेली इ साक्षरता विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे. - डॉ. सदानंद भोसले, संचालक रा.से. यो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अधिक वाचा: E Peek Pahani : ई-पीक पाहणी करायची राहून गेली काळजी करू नका; हा आहे अजून एक पर्याय