e-pik pahani :
संदीप वानखडे
बुलढाणा :
गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हो. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
या अनुदानाचे वितरण २६ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया कृषी सहायकांच्या वतीने सुरू आहे. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची वैयक्तिक ८०.२८ टक्के, तर कापूस उत्पादकांची ७९.९२ टक्के माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांना योग्य भावही मिळाला नव्हता. त्यामुळे, शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची घोषणा केली होती.
यासाठी ई-पीक पाहणी करण्याची अट होती. ई पीक पाहणी केलेल्या नऊ लाख पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांकडून हमीपत्र कृषी सहायकांकडे जमा करण्यात आले.
संयुक्त खातेदार असलेल्यांकडूनही हमीपत्र घेण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे सुरू आहे. आतापर्यंत ४ लाख १० हजार ३१८ वैयक्तिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ३ लाख २९ हजार ३८३ शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहे. तसेच ५ लाख २५ हजार २६१ वैयक्तिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ४ लाख १९ हजार ७९२ शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्यात आली आहे.
संयुक्त खातेदार शेतकऱ्यांना भुर्दंड
■ ई-पीक पाहणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांमध्ये संयुक्त खातेदार असलेल्या सर्वच शेतकऱ्यांची नावे आली आहेत.
■ आता या संयुक्त खातेदार असलेल्या सर्वांनाच हमीपत्र देऊन कोणाच्या खात्यात अनुदान जमा करायचे याविषयी कळवावे लागणार आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची अट करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे.
■ अनेक शेतकऱ्यांकडे एक एकर शेती आहे त्यांना केवळ एक हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यातही प्रतिज्ञापत्र तयार करण्याचा खर्च पाहता ही मदत परवडणारी नसल्याचे चित्र आहे.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ई केवायसी करायची आहे, त्यांनी आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क करावा. आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४८० वैयक्तीक कापूस उत्पादक तर ३ लाख २९ हजार ३८३ वैयक्तीक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपडेट झाली आहे.- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आकडेवारीवर एक नजर
कापूस उत्पादक शेतकरी | ५,२५,२६१ |
शेतकऱ्यांची माहिती अपडेट | ४,२४,४८० |
सोयाबीन उत्पादक शेतकरी | ४,१०,३१८ |
शेतकऱ्यांची माहिती अपडेट | ३,२९,३८३ |