E pik Pahani : राज्यभरातील खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील जवळपास १ कोटी ३८ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून पश्चिम घाटावरील भात लागवडी बाकी आहेत. येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये राज्यातील संपूर्ण लागवडी पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. तर आजपासून म्हणजेच १ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीला सुरूवात झाली आहे.
शेतातील पिकांचा पेरा ऑनलाईन पद्धतीने सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर ई पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना पीकविमा आणि पीककर्जापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करणे गरजेचे असते.
दरम्यान, ई पीक पाहणीतून समोर येणारी माहिती अधिक अचूक असावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे सुरू केला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प पायलट मोडवर राबवण्यात येणार आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे ई पीक पाहणी केली जाणार आहे.
ई पीक पाहणी कशी करावी?
शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी DCS अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर अॅपवर आवश्यक ती माहिती भरावी. भाषा, राज्य, जिल्हा, तालुका, नाव, गट क्र., शेतकऱ्याचे नाव, पिकाचे नाव आणि पिकांचा फोटो इत्यादी माहिती भरावी. पण जे तालुक्यांमध्ये यावर्षी डिजीटल क्रॉप सर्वे केला जाणार आहे अशा तालुक्यांमध्ये पीक पाहणी करण्यासाठी सदर गटाच्या हद्दीत जाणे आवश्यक आहे.