Pune : राज्यातील रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. पण विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात राज्य सरकारकडून काही ठिकाणी डिजीटल क्रॉप सर्वे करण्यात आला होता. पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे.
रब्बी हंगाम २०२४ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचा सामावेश आहे. तर रब्बी ज्वारी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. तर १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे.
शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२५ ही मुदत असून सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणी करण्यासाठी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ ही मुदत आहे. सुरवातीला शेतकरी स्तरावरून Mobile App द्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी Mobile App द्वारे नोंदवण्यात येणार आहे.
तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार/सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही. Geo Fencing बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्यावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे.
पीक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी येणाऱ्या १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.