पुणे : सातबारा उताऱ्यावर लागवडीखालील पिकांचे क्षेत्र नोंदविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-पीक पाहणी उपक्रमात २३ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर केवळ ६० टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे.
सर्वाधिक ७१ टक्के क्षेत्रावरील नोंद अमरावती विभागात झाली असून, सर्वांत कमी २८ टक्के नोंद कोकण विभागात झाली आहे. पुढील नोंद तलाठी तसेच सहायक स्तरावर २३ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.
पीक पाहणीसाठी यंदा १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. त्यात भूमी अभिलेख विभागाच्या अर्थात राज्याच्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे राज्यातील ३४ तालुक्यांतील २ हजार ८५८ गावे वगळून करण्यात येत आहे.
तर या २ हजार ८५८ गावांमध्ये केंद्र सरकारच्या 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपद्वारे पाहणी अर्थात पिकांची नोंदणी केली जात आहे.
गेल्या पंधरवड्यात राज्यात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविता आली नाही. त्यामुळे ई पीक पाहणीला आणखी सात दिवसांची मुदतवाढ अर्थात २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी (दि. २३) संपली.
त्यानुसार राज्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ ६०.५२ टक्के क्षेत्रावरील पिकांचीच नोंदणी सातबारा उताऱ्यावर करण्यात आली असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली. यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंत केवळ ४६ टक्के क्षेत्रावरील पिकांचीच नोंद झाली होती.
राज्याच्या ई-पीक अॅपद्वारे शेतकऱ्यांकडून झालेल्या नोंदणीनंतर आता उर्वरित नोंदणी तलाठी करणार आहेत, तर ३४ तालुक्यांत डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे नोंदणी करण्यात आली. येथे सहायकांच्या माध्यमातून पिकांची नोंदणी केली जाणार आहे.
विभागनिहाय झालेली पीक पाहणीविभाग क्षेत्र - (टक्के)अमरावती - ७३.११कोकण - २८.७१संभाजीनगर - ६१.१६नागपूर - ५८.७३नाशिक - ६६.९४पुणे - ४२.१६एकूण - ६०.५२