Join us

E-Pik pahani : पातूरचे शेतकरी डिजिटल क्रॉप सर्व्हेत एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 5:04 PM

डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पात पातूर अव्वल आहे. किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार ते वाचा सविस्तर (E-Pik pahani)

संजय गोतरकर / पातूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यांत १ ऑगस्टपासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पातूर तालुक्याची निवड केली आहे. तालुक्यात ३२ हजार ५५६ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ४१२ म्हणजेच ६२ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी आतापर्यंत पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकरी स्तरावर ऑनलाइन नोंदणी करण्यामध्ये पातूर तालुका डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये राज्यातून अव्वल आहे. आतापर्यंत ८७.१७ टक्के शेतकऱ्यांनी पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. केंद्र सरकार डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प प्रायोगिक (पायलट) तत्त्वावर राज्यात राबवीत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड करण्यात आली असून, त्या तालुक्यातील सर्वच गावांत ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यात येणार आहे.पातूर तालुक्यात २३ सप्टेंबरपर्यंत ८७.१७ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे. अतिवृष्टी किंवा अवकाळीच्या मदतीसाठी 'ई-पीक' पाहणीद्वारा पेऱ्यावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. पातूर तालुक्यात 'ई-पीक पाहणी'ला प्रतिसाद मिळत आहे. 

वरुड तालुका दुसऱ्यास्थानी■ तालुक्यातील ३२ हजार ५५६ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ४१२ म्हणजेच ६२ टक्के शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी आतापर्यंत पूर्ण केली आहे.

■ आतापर्यंत झालेल्या डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पातूर तालुका राज्यातून अव्वल असून, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका दुसऱ्यास्थानी आहे. वरुड तालुक्यात ८१.३५ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकरी स्तरावर ऑनलाइन नोंदणी करण्यामध्ये पातूर तालुका डिजिटल क्रॉप सव्र्व्हेमध्ये राज्यात पहिला आहे. उर्वरित १४ टक्के शेतकऱ्यांची पीक पाहणी तलाठी, कृषी साहाय्यकांमार्फत विहित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची 'ई-पीक पाहणी' बाकी आहे.  त्यांनी त्वरित करावी.- राहुल वानखडे, तहसीलदार, पातूर

टॅग्स :शेती क्षेत्रपीककृषी योजनाशेतकरीशेती