E-Pik Pahani : खरिपातील पिकांची नोंदणी डिजीटल प्लॅटफॉर्मवर करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. तर पिकविमा मिळण्यासाठीही ई-पीक पाहणी बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन ई-पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे. पण सध्या ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचं समोर आलंय.
दरम्यान, बीड बाजार समितीचे संचालक आणि शेतकरी धनंजय गुंदेकर हे आपल्या शेतात ई-पीक पाहणी करण्यासाठी गेले असता सदर अॅपवर ई-पीक पाहणीचा मध्य हा अडीच ते तीन किलोमीटर दूर दाखवल्यामुळे त्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जोपर्यंत आपण शेताच्या मध्यावर जात नाही तोपर्यंत ई-पीक पाहणीसाठी पिकांचे फोटो पोर्टलवर अपलोड करता येत नाहीत. पण पोर्टलवर गट क्रमांक टाकून सदर शेतात जाऊनही सॅटेलाईटद्वारे गट क्रमांकाचा मध्य हा अडीच ते तीन किलोमीटर दूर दाखवत असेल तर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी कशी करावी असा सवाल गुंदेकर यांनी केला आहे.
महसूल विभागाने ई पीक पाहणी करण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे. पण हे अॅप व्यवस्थित चालत नाही. अनेकदा गुगल लोकेशन, सॉफ्टवेअरच्या अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तर शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या पिकांची नोंदणी या पोर्टलवर करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात केवळ १२ दिवस राहिल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.
ई पीक पाहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर मध्य येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे? ई पीक पाहणीच्या अॅपवर अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर शेतकऱ्यांनी काय डोकं फोडून घ्यावं का? ज्यांनी हे अॅप विकसित केलं आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.- धनंजय गुंदेकर (शेतकरी, संचालक-बीड बाजार समिती)