E-pik Pahani Issue :
फुलंब्री : तालुक्यातील पाल येथील १ हजार ६४९ शेतकऱ्यांच्या शेताचे नवे नकाशे संबंधित ॲपमध्ये अपलोड केले नसल्याने या शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची भीती या शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत बुधवारी (२३ ऑक्टोबर) रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
पाल गाव व परिसरात १ हजार ६७७ हेक्टर क्षेत्र असून, सातबाराधारक शेतकऱ्यांची संख्या १ हजार ६४९ आहे. या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नवीन नकाशे प्रशासनाने संबंधित ॲपमध्ये अपलोड केलेले नाहीत. त्यावर जुनेच नकाशे आहेत. त्यामुळे जमिनीचे अचूक क्षेत्र दिसत नाही.
परिणामी ई-पीक ऑनलाइन नोंदणी होत नाही. ही नोंदणी झाली नाही तर शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने हे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत या शेतकऱ्यांनी १९ सप्टेंबर रोजी फुलंब्री येथील तहसीलदारांना निवेदन दिले होते; परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना भेटून निवेदन दिले. यात ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी ज्ञानेश्वर जाधव, विजय तमखाने, सारंगधर जाधव, बलराज जाधव, रामदास जाधव, धोंडोराज ढेपले आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाहीपाल येथील ई पीक नोंदणीचा विषय पुणे येथील विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. ऑनलाईन नोंदणी झाली नाही तर दुसऱ्या उपयोजना करू. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. -डॉ. कृष्णा कानगुले, तहसीलदार
ई-पीक नोंदणी कशासाठी?
• शेतकऱ्यांचा शेतमाल किमान आधारभूत किमत योजनेअंतर्गत विक्री करण्यासाठी• पीक कर्जाच्या पडताळणीसाठी.• पीक विमा योजनेच्या लाभासाठी.• नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.