पुणे : राज्यात रब्बी हंगामात आता ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी Digital Crop Survey DCS 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा वापर केला जाणार आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एका सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहाय्यक उर्वरित क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करणार आहेत.
शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, असे प्रशासनाने सांगितले. सातबारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अॅपचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हे अॅप राज्यभरात वापरले जात आहे.
मात्र, गेल्यावर्षापासून केंद्र सरकारच्या 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा काही तालुक्यांत वापर करण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामात या अॅपचा संपूर्ण राज्यभर वापर करण्यात येणार होता. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक नोंदणीव्यतिरिक्त सहाय्यकांच्या माध्यमातून पीक नोंदणी केली जाणार होती.
मात्र, निधीची कमतरता भासल्याने राज्य सरकारने या अॅपचा वापर गेल्या उन्हाळी हंगामाप्रमाणेच केवळ ३४ तालुक्यांतील २ हजार ८५८ गावांतच करण्याचे ठरवले होते. सहाय्यकांऐवजी ग्रामस्तरावरील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून ई-पीक पाहणी करण्यात आली.
आता रब्बी हंगामासाठी पीक पाहणी १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली असून, त्यासाठी मात्र संपूर्ण राज्यासाठी केंद्र सरकारच्या 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा वापर केला जाणार आहे. तर यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक नेमण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना पिकांच्या नोंदणीसाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारी अशी मुदत देण्यात आली असून, पहिल्या दिवसापासून हे सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. मुदत संपल्यानंतर पीक नोंदणी न झालेल्या क्षेत्रांच्या नोंदणी स्वतः सहाय्यक करणार आहेत.
त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या नोंदणीवर शेतकरी किंवा सहाय्यकांची हरकत असल्यास मंडळ अधिकारी पुढील १५ दिवसात त्याची दुरुस्ती करणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक पाहणी १५ मार्चपर्यंत चालणार आहे.
५० मीटरच्या आतील फोटो बंधनकारक
■ पूर्वीच्या ई-पीक पाहणी अॅपमध्ये शेतीच्या प्रत्येक गट क्रमांकाचा मध्यबिंदू पासून ज्या ठिकाणाहून फोटो काढतो, त्याचे अंतर गृहित धरले जात होते.
■ आता केंद्राच्या सूचनेनुसार सीमेपासून ५० मीटर पर्यंत जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरच पुढील माहिती भरता येईल. याचाच अर्थ ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार नाही.
■ नव्या अॅपमध्ये पीक पाहणी करताना पिकांचे १०० टक्के फोटो उपलब्ध व्हावेत, अशी अट टाकण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पिकाचे दोन फोटो काढावे लागणार आहेत. आता या नव्या बदलानुसार पिकांची नोंद करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचण आल्यास सहाय्यकांची मदत घ्यावी. नोंदणी न झालेल्या क्षेत्राची पीक पाहणी सहाय्यक करणार आहेत. - सरिता नरके, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प, पुणे
अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर