Join us

E-Pik Pahani : सोयाबीन काढून ज्वारी पेरली! खरिपातील सोयाबीनची ई-पीक पाहणी आत्ता करायची कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:15 PM

E-Pik Pahani : ई- पीक पाहणीसाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. पण खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघून गेली आहेत.

पुणे : राज्यातील खरीप पिकांची अनेक भागांत काढणी सुरू असून पिकविमा आणि अनुदानासाठी महत्त्वाची असणारी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील ई-पीक पाहणी बाकी होती. त्यामुळे ई-पीक पाहणीची अट आता २६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण मराठवाड्यातील अनेक भागांत सोयाबीन काढून ज्वारीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

राज्यात १ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तर १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील शेतकरी पातळीवर आणि तलाठीपातळीवर १ कोटी २० लाख हेक्टरवरील क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली. त्यापैकी ७९ लाख शेतकरी आणि ५ लाख ६० हजार शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी तलाठी स्तरावर करण्यात आली. या क्षेत्रावरील एकूण खातेदार संख्या ही २ कोटी २६ लाख एवढी होती.

दरम्यान, राज्यात यंदा १ कोटी ४५ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर १५ सप्टेंबरपर्यंत त्यातील केवळ १ कोटी २० लाख हेक्टरवरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली. उर्वरित २५ लाख हेक्टरवरील ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पण ही ई-पीक पाहणी तलाठी स्तरावर केली जाणार आहे. 

विशेष म्हणजे मराठवाड्यातील लवकर पेरण्या झालेल्या बीड जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी पूर्ण केली आहे. तर रब्बी ज्वारीची पेरणीही पूर्ण केली आहे. मग अशा भागांत ई-पीक पाहणी कशी करायची हा प्रश्न निर्माण होत आहे. मोबाईलवरून करता येणाऱ्या ई-पीक पाहणीसाठी आपल्याला गुगल लोकेशनद्वारे आपल्या शेतामध्ये जाणे आवश्यक होते पण सध्या सुरू असलेली ई-पीक पाहणी तलाठीस्तरावर होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक विमा