ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याला मात्र ताप झाला आहे. ई-पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिल्लक असले तरी अद्याप बहुतांश शेतक-यांनी ई-पीक पाहणी केलीच नाही.
ही प्रक्रिया करीत असताना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली आहे.
पात्र शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी केली तरच विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पीक कर्ज, पीक विमा, नुकसानभरपाई नैसर्गिक आपत्ती काळात शासकीय मदत मिळावी, यासाठी ई-पीक पेरा नोंद बंधनकारक करण्यात आलेली आहे.
खरीप हंगाम २०२४ साठी क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने हा डाटा महत्त्वाचा ठरणार आहे. पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, पतपुरवठा, पीक विमा, पीक पाहणीचे दावे निकाली काढण्यासाठी सोयीचे होणार आहे.
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा मिळणार आहे. आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत होणार आहे.
परंतु, शेतात जाऊन अॅपमध्ये थेट फोटो डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतात जाऊन शेतीपिकांचे फोटो अपलोड करण्यासाठी नेटवर्क चालत नसल्याने, तसेच सर्व्हरमध्ये अडथळे येत असल्याने अनेक शेतकरी अद्यापही ई- पीक पाहणी करू शकले नसल्याचे दिसून येत आहे.
ई-पीक पाहणी करा, अन्यथा नुकसानभरपाई सोडा
● शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असो की, पीक विमा योजना याचा लाभ घ्यायचा असेल तर ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे, अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे.
● यापूर्वी पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर नुकसानभरपाई झाल्यास शेतकऱ्यांना मोबदला मिळत होता. परंतु, आता शासनाने त्यामध्ये बदल केलेले असून, ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
यांची घ्या मदत
शेतकरी अॅपद्वारे पीक पेरा नोंदविण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, स्वस्तधान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र स्वाक्षर स्वयंसेवकांची मदत घेऊ शकतात.