Join us

आधी एकरी १० ते १५ कट्टे आता केवळ दीड कट्टा हरभरा पडतोय पदरात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 1:24 PM

शेतकऱ्यांची चिंता वाढली; हरभरा उत्पादनामध्ये घट

बोरगाव काळे परिसरातील निवळी, एकुर्गा, शिराळा, भिसे वाघोली येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील उत्पादनवाढीसाठी हरभऱ्याची पेरणी केली होती. सध्या हरभरा पिकाच्या राशी केल्या जात आहेत. हरभऱ्याच्या उतारावरून उत्पादन नजरेस येत आहे.

सध्या हरभऱ्याच्या उत्पादनात घट आणि बाजार मार्केटमध्ये दरही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे घटलेले उत्पादन आणि बाजारपेठेतील दर यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन कसे निघणार असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. हंगामाच्या सुरुवातीस परतीचा - पाऊस होईल व रब्बीची पेरणी करता होईल असे शेतकऱ्यांना वाटत होते.

दरवर्षी हरभऱ्याचे एक एकरमध्ये उत्पादन १० ते १५ कट्टे होत असत. मात्र, यावर्षी पावसाचे कमी प्रमाण व वातावरणातील बदलामुळे काही शेतकऱ्यांच्या हरभरा उत्पादनात घट येत असून, एकरी दीड कट्टा हरभरा उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. त्यामुळे चिंता वाढली असल्याचे बोरगाव काळे येथील शेतकरी संदीपान फोलाने, नितीन साखरे यांनी सांगितले. मात्र परतीच्या पावसाने पाट फिरवल्याने सिंचनाची सोय असलेल्या व इतर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पोषक वातावरणामुळे हरभरा पीक हे बहरात असतानाच अवकाळी पाऊस, धुके यामुळे फुलगळ होऊन मर रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे उत्पादनात घट आल्याचे या भागात दिसून येत आहे.

टॅग्स :हरभराशेतीशेतकरी