उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तहान लागण्याचे प्रमाण खूप वाढते. यासाठी आपल्या आहारात फळांचा वापर वाढणे आरोग्यास हिताचे आहे.
कलिंगडे, स्ट्राबेरी, आंबा, खरबूज ही फळे प्राधान्याने खाल्ल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात तहान लागण्याचे प्रमाण वाढते. उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड पेय प्यायची ओढ रास्त असते.
निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे भरभरून देत असतो, ती खाण्याची गरज आहे. आंबा, द्राक्षे, कलिंगड यासारखी रसरसशीत फळे निसर्ग देते. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उपलब्ध असेलेली फळे खावीत. शेतात काम केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते अशावेळी पाणी असणारे फळे खावीत.
उन्हाळ्यातील फळे आणि त्याचे फायदे
कलिंगड
यात सर्वात जास्त पाणी, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर यांचा समावेश असतो. सर्वाधिक लायकोपिन, ऑक्सिडन्ट्स आणि व्हिटॅमिन ए आणि सी यांचे प्रमाण आढळते. कोलेस्ट्रॉलही नसते आणि ते डोळ्यांसाठीही फायदेशीर असते. हृदयविकाराच्या समस्या, कॅन्सर, मधुमेह या समस्यांपासून कलिंगड बचाव करते.
खरबूज
हे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वोत्तम फळ मानले जाते. परंतु, काही लोकांचे मत आहे की या फळासोबत पाणी पिऊ नये. खरबुजामध्ये सेंद्रिय रंगद्रव्ये कॅरोटीन्वाईड्स, व्हिटॅमिन अ आणि ब. एडेनोसिन मीठ, अँटीकोआगुलंट आणि सोडियम हे देखील आढळतात. हे फळ गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.
आंबा
फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखले जाते. आंबा हे फळ पोषकत्तत्त्वांनी परिपूर्ण असून यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॉपरसोबत व्हिटॅमिन ए, सी आणि बी-६ आढळते. हृदयरोग, कर्करोग आणि अकाली वृद्धत्व या समस्यांपासून आंबा बचाव करते.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. स्ट्रॉबेरीच्या रसामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
अधिक वाचा: उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक