ऋतुमानानुसार फळे खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे; परंतु आम्लयुक्त फळांचे उपाशीपोटी सेवन केले, तर ॲसिडिटीचा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे उपाशीपोटी आम्लयुक्त फळे खाणे टाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळतात. त्यामुळे शरीरासाठी फळे लाभदायक ठरतात; परंतु लिंबूवर्गीय फळे, अननस आदी आम्लयुक्त असलेली फळे जर उपाशीपोटी खाल्ली, तर अॅसिडिटीचा अधिक त्रास होऊ शकतो. शिवाय आंबा गोड असला तरी शुगर असणाऱ्यांनी उपाशीपोटी याचे अधिक प्रमाणात सेवन केले, तर त्यांना शारीरिक त्रास उद्भवू शकतो. यामुळे उपाशीपोटी फळे खाण्याऐवजी काहीतरी नाश्ता केल्यानंतर या फळांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. सफरचंद, डाळिंब, टरबूज, अंजीर आदी फळे उपाशीपोटी खाल्ली, तर त्यांचा मात्र त्रास होत नाही. त्यामुळे शारीरिक त्रासदायक ठरणारी फळे उपाशीपोटी खाणे टाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
उपाशी पोटी काय खावे?
कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण असलेले सफरचंद, पाण्याचे प्रमाण अधिक असलेले टरबूज, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बी असलेले अंजीर, डाळिंब, पपई आदी फळे उपाशीपोटी खाल्ली, तर त्याचा शरीराला चांगला लाभ होतो.
उपाशीपोटी आम्लयुक्त फळे खाऊ नयेत
आम्लयुक्त्त संत्री, मोसंबी, पेरू आदी फळे उपाशीपोटी खाणे टाळावे. ही फळे खाल्ली, तर अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सफरचंद, पपई आदी फळे खाल्ली, तर त्रास होत नाही. -डॉ. सोनाली जेथलिया, आहारतज्ज्ञ
ही फळे उपाशीपोटी खाणे टाळा
■ पेरु, बोरं : पेरू, बोरे या फळांमध्ये अधिक प्रमाणात आम्ल असते. त्यामुळे उपाशीपोटी ही फळे खाल्ली की, छातीत जळजळ होते. पोटाचा त्रास होतो.
■ आंबा : आंबा हा गोड असतो. शुगर असलेल्या व्यक्तींनी उपाशीपोटी या फळाचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.
■ संत्री, मोसंबी : या फळांत आम्ल अधिक असते. शिवाय व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही फळे उपाशीपोटी खाणे टाळावे.
■ अननस : अननसही आम्लयुक्त आहे. उपाशीपोटी सेवन केले, तर अॅसिडिटीचा त्रास अधिक प्रमाणात होतो.
■ अंबट द्राक्ष : आंबट द्राक्ष उपाशीपोटी खाणेही शारीरिक त्रास वाढविणारे ठरते.