उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, शरीराला गारवा देणाऱ्या टरबुजाची मागणी वाढली आहे. टरबूज खाल्ल्याने उष्णतेपासून काही काळ आराम मिळतो. त्यामुळे लालबुंद टरबुजाच्या दरात देखील वाढ झाली आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने सकाळी ११ नंतर बीड शहरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अशातच बाजारात लालबुंद व चवदार टरबुजाची मागणी वाढली आहे. त्यामुळे टरबुजाचे दर देखील तेजीत आले आहेत. सध्या बाजारात लहान टरबूज २० ते ३० रुपये तर मोठे टरबूज ५० ते ६० रुपयांना मिळत आहे. शुगर क्विन जातीचे टरबूज खायला चविष्ट असल्याचे सुरेश सोलाट यांनी सांगितले.
अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग
बाजारात विविध जातींचे टरबूज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे टरबुजाची मागणी वाढल्याचे विक्रेते बाबा बागवान यांनी सांगितले. तसेच टरबूज उत्पादक शेतकर्यांना देखील यंदा हे पिके अधिकचे पैसे मिळवून देत आहे.
दरम्यान, कडक उन्हाळा सुरू झाला असून, वाढत्या तापमानात शरीरातील पाणी कमी होते. नागरिकांनी आहाराकडे लक्ष देऊन रसाळ फळांचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील पाणीपातळी राखली जाते, असे डॉ. विजय सिकची यांनी सांगितले.