Economic Survey Agriculture Growth देशातील कृषी क्षेत्राचा विकास दर 2023-24 मध्ये 1.5% पेक्षा कमी होण्याचा अंदाज अर्थसंकल्पपूर्व देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला असून कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी ही गंभीर बाब समजली जात आहे. विशेष म्हणजे हा अंदाज मागील वर्षाच्या आणि गेल्या 5 वर्षांच्या सरासरी विकास दराच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे.
देशाचा अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. त्याआधी आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. जागतिक अनिश्चिततेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असली तरी कृषी क्षेत्राचा विकास दर खूपच कमी झाल्याचे त्यात म्हटले आहे.
कृषी क्षेत्राचा विकास दर 2023-24 या वर्षात 1.5 टक्क्यांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या आणि गेल्या 5 वर्षांच्या सरासरी विकास दराच्या एक तृतीयांशपेक्षा कमी असेल.
भारतीय कृषी क्षेत्र हे देशातील ४२.४ टक्के लोकांना पोटापाण्यासाठी आधार देते. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १८.२ टक्के वाटा आहे, असे आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
या क्षेत्राने गेल्या 5 वर्षांत स्थिर किंमतींवर सरासरी वार्षिक 4.18 टक्के वाढ साधली आहे. परंतु आर्थिक सर्वेक्षणात, 2023-24 या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर केवळ 1.4 टक्के (तात्पुरता अंदाज) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 2022 च्या 4.7 टक्के वाढीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे. तसेच, गेल्या 5 वर्षांच्या सरासरी विकासदराच्या हे प्रमाण केवळ एक तृतीयांश आहे.
कृषी क्षेत्राचा विकास दर का घसरला?आर्थिक सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, किमान आधारभूत किंमत (MSP) द्वारे शेतकऱ्यांना फायदेशीर किमतीची खात्री करणे, संस्थात्मक कर्जामध्ये सुधारणा करणे, पीक वैविध्यीकरण सक्षम करणे, डिजिटलायझेशन आणि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि उत्पादकता वाढवणे यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीवर गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्राच्या वाढीवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
परंतु 2023-24 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर लक्षणीयरीत्या कमी होण्याचे कारण म्हणजे एल निनोमुळे उशीरा आणि खराब मान्सूनमुळे अन्नधान्य उत्पादनात झालेली घट. सन २०२२-२३ मध्ये अन्नधान्य उत्पादन ३२.९७ कोटी टनांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. परंतु खराब मान्सूनमुळे ते 2023-24 मध्ये 32.88 कोटी टन इतके कमी झाले.