Join us

ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 10:05 AM

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्‍याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्‍याने आता होणाऱ्या कांदा लागवडीला याचा फटका बसत असून शेतात टाकलेले कांद्याचे रोप ढगाळ वातवरणामुळे जळत असल्‍याने शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी उन्‍हाळी कांद्याची लागवड करण्याच्या दृष्‍टीने महागडी बियाणे आणून शेतात टाकली होती. परंतु, ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्‍या कांद्याची पात पिवळी पडून करपू लागली आहे. कांद्याचे महाग बी, रोपे विकत घेऊन शेतात लावले. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कांदा पिक पिवळे पडत आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

मागील दोन दिवसाच्या पावसामुळे उन्हाळी लागवडीचा कांदा रोपांना मोठा फटका बसणार आहे. कांदा रोपांवर बुरशीजन्य रोगचाही विळखा पडण्याची शक्यता आहे. शेतात टाकलेले कांद्याचे निम्‍मेहून अधिक रोप वाया गेले आहे. आता अजून दोन दिवस असेच वातावरण राहिल्‍यास संपुर्ण कांद्याचे पिक वाया जाणार आहे.

याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. फुलोऱ्यात असलेल्या तुरीला मारूका तर कापसाला बोंड अळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन काढणीत असलेल्या या पिकांचा किडीपासून बचाव केला तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा यामुळे धुई पडत आहे. तर कांद्याची वाढीवरही बदललेल्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. तूरीवर मरुका अळी, कापसाला बोंडअळीचा तर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही तीन्हीही पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रति मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय बुरशीचाही धोका वाढत आहे. फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी २० ग्रॅम किंवा नोवलुरोन ५.२५ इंडोक्झाकार्ब ४.५० एससी १६ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.

खरिपातील कापसाला यंदा विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान या पिकातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. तर आता कापूस वेचणी सुरु असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होणार आहे. शिवाय ‘बीटी’ची फवारणी करुन पिकाचे या वातावरणापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.

डॉ. एम. एम. देशमुख (सहा. प्राध्यापक), एस.एम.एस.एस. कृषि महाविद्यालय, छ.संभाजीनगर

टॅग्स :पीककापूसकांदाशेतकरीशेतीतूरहवामान