शेतकऱ्यांच्या प्रमुख जोडधंद्यापैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय वाढते ऊन, पाणीटंचाई, वाढती महागाई यामुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे बॉयलर कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जास्त होतो आहे.
गत महिनाभरापासून रात्री गारवा आणि दिवसा कडक ऊन असे वातावरण आहे. या विषम हवामानाचा थेट परिणाम होऊन कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पोल्ट्री व्यवसायाला उन्हाच्या चटक्यांचा चांगलाच फटका बसत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.
उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड
पोल्ट्री व्यवसाय काही शेतकऱ्यांचा प्रमुख शेतीपूरक व्यवसाय असून, अनेकांनी प्रगती साधली आहे; परंतु सध्या कोंबड्यांना उन्हाळी वातावरण मानवत नाही. त्यातच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड होत आहे.
कोंबड्यांना पाणी बदलून चालत नाही, तसे केल्यास कोंबड्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच ठिकाणी द्यावे लागते. मात्र, सध्या विहिरींसह कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड बनल्याचे चित्र आहे.
संगोपन खर्चात वाढ
■ गेल्या वर्षभरात कोंबड्यांचे खाद्य महागले आहे. त्यामुळे खर्चामध्ये प्रति किलो ५ ते ७ रुपयांनी वाढ झाली आहे.
■ कोंबड्यांचे भावही वाढले आहेत मात्र वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांचे वजन न वाढणे, उन्हाळ्यातील पाणीटंचाई, मजुरांची टंचाई, कमतरता यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे.
■ परिणामी, अनेक व्यावसायिकांचे शेड उन्हाळ्यात रिकाम्या राहतात. मजुरी ४०० रुपये दररोज तर कोंबडी पिलांचा प्रति दर ४० रुपये अशी वाढ झाली आहे.
व्यवसाय तोट्यात जाण्याची भीती
वाढती उष्णता, पाणीटंचाईमुळे कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. चार दिवसांना एक टैंकर घ्यावा लागत असून, टँकरचे भाव तीन हजारांवर गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढल्याने कोंबड्यांचे वजन म्हणावे तेवढे वाढत नसून सरासरी घटत आहे. कोंबड्यांना खाद्यही जास्त लागत आहे. कोंबड्यांचे खाद्य ४० रुपये किलोप्रमाणे खरेदी करावे लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात व्यवसाय तोट्यात जाण्याची भीती आहे. - आजमोद्दीन शेख, पोल्ट्री व्यावसायिक, दुकडेगाव जि. बीड