महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावी, असे मत वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
मधमाशापालन, मध निर्मिती, मधमाशांबाबतचे गैरसमज याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय (दि १८, १९ जानेवारी) मध महोत्सवाचे आयोजन खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पूलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येला अत्यंत चांगले पोषण मधातून मिळते. अगदी लहान बाळापासून आजारी, वृद्धांपर्यंत सर्वांसाठी मध उपयुक्त आहे. ज्या गावांमध्ये मधुमक्षिका पालन केले जाते त्या ठिकाणी शेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
अधिक वाचा: आता नकाशा, सात-बारासह पाहता येणार रेडीरेकनरचे दर
मध आपल्या जीवनात गोडवा निर्माण करतेच पण तिजोरीत सुद्धा भर घालते. रोजगार निर्मिती हा मधमाशापालनाचा एक भाग आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यात सेंद्रिय मध निर्मितीसाठी पिरली आणि मामगा या दोन गावांची निवड केली. यासाठी सामाजिक दायित्व निधीचा चांगला उपयोग करून घेता येईल. राज्याला मधनिर्मितीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वसमावेशक अशी उत्तम योजना तयार करावी. मधाच्या लक्ष्यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
रवींद्र साठे म्हणाले, मधमाशी पालनातून रोजगार, पीक उत्पादनात वाढ, शरीराचे पोषण आणि आरोग्य अशा सर्वच बाबी मधमाशी देते. गाव तिथे मधपेटी, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण, मधाची गावे तयार करणे, शेतकऱ्यांप्रमाणेच महिला बचत गटांना यात गुंतवणे आदी बाबी खादी ग्रामोद्योग मंडळ येत्या काळात राबवणार आहे. त्याचबरोबर मधमाशीच्या विषाला सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे ‘मधमाशीचे विष संकलन‘ हा ड्रीम प्रोजेक्ट राबविणार असल्याचे श्री साठे यांनी सांगितले.
या महोत्सवातून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांनी मधमाशीच्या जगाचे, जीवन प्रवासाचे आणि तिच्या उपयुक्ततेचे ज्ञान आत्मसात करावे. शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन कसे जगावे याचा धडा मधमाशीच्या कार्यातून मिळतो, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील मधपाळ सन्मानाने शेतकरी, सरपंच व गावांचा सन्मान करण्यात आला. यात लातूरचे दिनकर पाटील, अहमदनगरचे राजू कानवडे, महाबळेश्वरमधील मांगर गावचे सरपंच गणेश जाधव, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे सरपंच रवींद्र भुजड आणि नुकतीच निवड झालेले गाव घोलवडचे सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी मांडली तर सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी केले.
अधिक वाचा: फायदेशीर चंदन लागवडीचे तंत्रज्ञान
या महोत्सवात मधापासून तयार करण्यात आलेले चॉकलेट, आवळा कॅंडी, जांभूळ, ओवा, सूर्यफूल, तुळशी असे विविध प्रकारचे मध, मधापासून तयार केलेला साबण, सुगंधी मेणबत्त्या तसेच मधमाशीचे जीवन कार्य, मधाची चाचणी तसेच मधपेटी अशा विविध बाबींचे प्रदर्शन भेट देणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालते. उद्या १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता मध व आरोग्य यावर परिसंवाद, १२.३० वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासून विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर. विमला यांनी केले आहे.