केवळ साखरेचे उत्पादन घेणाऱ्या सांगोला सहकारी, ओंकार शुगर या साखर कारखान्यांनी उसाला २,७०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. असे असताना साखरेसोबत इथेनॉल, वीज व इतर उत्पादनांतून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या साखर कारखान्यांनीही २७०० रुपये व त्यापेक्षा कमी दर जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात ४१ साखर कारखाने असून, एक-दोन वगळता ३८-३९ साखर कारखान्यांचा कधीही हंगाम सुरू करता येतो.
जशी कारखान्यांनीच संख्या वाढत गेली तसे जिल्ह्यात ऊस क्षेत्रही वाढत आहे. शेतकरी मोठ्या जिद्दीने ऊस क्षेत्र वाढवत आहे. मात्र निसर्ग साथ देताना दिसत नाही. एक वर्ष ऊस पावसात तर एक वर्ष पावसाअभावी वाया गेला. अगोदर उसापासून केवळ साखर तयार व्हायची. त्यावेळेस साखर कारखाने उसाला अडीच हजारांपर्यंत दर देत होते. अलीकडील ७-८ वर्षांत साखर कारखान्यांना साखरेतून पैसे मिळतातच शिवाय इथेनॉल, वीज व इतर बाबींतून बक्कळ पैसे मिळतात. जिल्ह्यात यावर्षी उसाचे क्षेत्र दोन लाख ४० हजारावर असताना पावसाअभावी वाढ झाली नसल्याने कारखान्यांना ऊस कमी पडतोय.
अशातही केवळ साखर उत्पादन घेणाऱ्या सांगोला सहकारी (सांगोला), ओंकार (चांदापुरी) या साखर कारखान्यांनी मोळी टाकतानाच टनाला २७०० रुपये दर जाहीर केला. मात्र इथेनॉल, वीज व इतर बाबींतून प्रत्येक हंगामात करोडोंची उलाढाल करणाऱ्या कारखान्यांनी प्रथम २,५०० व नंतर २,७०० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, तो खात्यावर जमा होताना दिसत नाही.
कारखान्यांचे गणित उलटे- दरवर्षीच ऊस उत्पादन खर्च वाढतोय. मात्र, साखर कारखान्यांच्या ऊस दराचे गणित उलटे आहे. उदाहरणार्थ बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याने २०१९-२० मध्ये प्रति टनाला २५२५ रुपये दर दिला.- पुढच्याच वर्षी २०२०-२१ मध्ये २०५२ रुपये तर २०२१-२२ मध्ये आणि २००० रुपये दर दिला. मागील वर्षी २२०० रुपये देणेही परवडले नसताना लोकमंगल कारखान्याने यावर्षी २७०० रुपये दर जाहीर केला. इथे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा कधीच विचार होत नाही.
कारखानदारांना साखर, इथेनॉल, वीज व इतर उपपदार्थ विक्रीतून किती पैसे मिळतात, याचा हिशोब सभासदांना देत नाहीत. कारण खासगी साखर कारखाने आहेत, असे सांगितले जाते. उसाची टंचाई असेल तर अडीच हजारांपेक्षा अधिक दर व ऊस भरपूर असेल तेव्हा २,२०० रुपयेही देणे कारखान्यांना परवडत नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या हातात काही ठेवले नाही. - शिवाजी पाटील, ऊस उत्पादक शेतकरी