Join us

जगातून लोप होण्याच्या मार्गावर असलेली 'सोनघंटा' फुलली मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:50 PM

'आययूसीएन'च्या मानांकनानुसार वनस्पतीची नोंद धोक्याच्या यादीत

जगात केवळ महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत आढळणारी दुर्मीळ वनस्पती सोनघंटा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात प्रथमच फुलली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानांकनानुसार सोनघंटा वनस्पतीची नोंद धोक्याच्या यादीत करण्यात आली आहे.

सोनघंटा वनस्पती सर्वप्रथम शास्त्रज्ञ नामदेव रानडे यांनी आंबाघाटमध्ये १८८९ साली शोधून काढली. त्यामुळे सोनघंटा या वनस्पतीला "abutilon ranadel" या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. १८९४ साली ही प्रजाती नवीन असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तब्बल ९० वर्षानंतर वनस्पतीशास्त्रज्ञ माणिक मिस्त्री व डॉ. अलबेडा यांनी १९८९ मध्ये पुन्हा वनस्पतीचा पुनर्शोध लावला.

दुर्मीळ आणि संकटग्रस्त वनस्पतीचे संरक्षण, संवर्धन आणि जतनासाठी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात सर्पराज्ञी दुर्मीळ व अतिदुर्मीळ वनांची निर्मिती केलेली आहे. या वनांमध्येच सोनघंटा वनस्पतीची लागवड करण्यात आलेली आहे. वनस्पतीला शुक्रवारी फुले आली आहेत.

वास्तविक पाहता सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये सोनाघंट्यास डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये फुले येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, मराठवाड्यामध्ये प्रथमच फुललेल्या सोनघंट्यास नोव्हेंबरमध्येच फुले आली आहेत. सोनघंटा वनस्पतीची फुले घंटेच्या आकाराची, सोनेरी रंगाची व आकर्षक दिसतात. त्यामुळे वनस्पतीचे मराठी नामकरण सोनघंटा असे करण्यात आलेले आहे, अशी माहिती सर्पराज्ञीचे संचालक तथा मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :फुलंफुलशेतीबीडमराठवाडा