उद्योजकीय दृष्टिकोन व संघटित शक्ती शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेऊ शकते. उद्योजकीय दृष्टिकोन नसेल तर कोणत्याही व्यवसायाची वाहत होते. काळाची पाऊले ओळखून स्वतःला बदलणे गरजेचे असल्याचे मत मगरपट्टा सिटी ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी केले.
मोहाडी तालुका दिंडोरी येथील सह्याद्री फार्मच्या प्रांगणात मंगळवारी (२६) सह्याद्री फार्मच्या तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी 'मगरपट्टा सिटी- शेतकऱ्यांच्या शाश्वत समृद्धीचा संघटित प्रवास' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व संचालक विलास शिंदे, संचालक डॉ. क्षमा फर्नांडिस, अजहर तांबुवाला, कैलास माळोदे, रामदास पाटील, महेश भुतडा, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
सतीश मगर म्हणाले, नाशिक भागातही मोठ्या औद्योगिक वसाहती वाढत आहेत. नवे महामार्ग प्रस्तावित आहेत. रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्याही या भागाकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. या बदलाकडे आपण संधी म्हणून पाहीले पाहिजे. शेतीतील पिकांचे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन ‘सह्याद्री’चे शेतकरी घेतच आहेत. आता पिक उत्पादनाच्या बरोबर अजूनही नव्या बदलाला साजेसे अजून कोणते व्यवसाय करता येईल याचाही विचार करा. आपल्या भविष्याचा विचार करुन जर आपण व्यवस्थित बांधणी केली तर या वाढणाऱ्या शहरीकरणाचा, पर्यायाने प्रगतीचा जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल हे आता पाहिले पाहिजे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांची सामुहीक शक्ती एकत्र आली की काय चमत्कार होऊ शकतो याचे ‘सह्याद्री’ एक उदाहरण आहे. ‘सह्याद्री’कडे असलेली 19 हजार शेतकऱ्यांची संघटीत शक्ती ही मोठी ताकद आहे. तुमची स्वत:ची एक अंतर्गत शिस्तबध्द, दर्जेदार व्यवस्थापन यंत्रणा आहे. अनावश्यक राजकारणापासून तुम्ही कोसो दूर आहात. हाच तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे. या फायद्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा.
जे जगात कुणी केले नाही ते ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी करुन दाखवले आहे. तुम्ही इतके करु शकला आहात तर तुम्ही अजून खूप काही करु शकता यावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही आता एक स्टॅण्डर्ड गाठले आहे. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हा मार्ग तयार झाला आहे. ‘सह्याद्री’मध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने सभासद आहेत हे विशेष कौतुकास्पद आहे. जो पर्यंत घर सक्षम होत नाही तो पर्यंत समाज सक्षम होत नाही. आपल्या पेशीमध्ये ती उद्यमशीलता आता रुजली आहे. एक विशाल भव्य विचार करण्याची कुवत आपल्यात आली आहे. काळाची पाऊले ओळखून स्वत:ला बदलावे. नवा बदल अंगिकारुन आपण सर्वांनी पुढे जावे." असेही ते म्हणाले.
विलास शिंदे यांनी प्रास्ताविकात ‘सह्याद्री फार्म्स’च्या मागील 12 वर्षातील वाटचालीचा आलेख मांडला. श्री. शिंदे म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून प्रारंभ करतांना अनेक आव्हानांतून जावे लागले. मात्र मागील 12 वर्षे एक स्पष्ट दिशा ठेवून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘सह्याद्री’ची ओळख बनत गेली. त्यातुनच सह्याद्रीने वर्ष 2022-23 अखेर वार्षिक उलाढालीचा 1007 कोटीचा पल्ला गाठला आहे.
‘सह्याद्री फार्म्स‘चे संचालक मंगेश भास्कर यांनी सूत्रसंचालन केले. रामदास पाटील यांनी आभार मानले.
सह्याद्री फार्मर ऑफ द ईयर
‘सह्याद्री फार्म्स‘ तर्फे दरवर्षी उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकरी सभासदास एक लाख रुपये धनादेशासह ‘सह्याद्री फार्मर ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार कुर्णोली येथील यादव तुकाराम संधान, शंकर यादव संधान व विंचुर गवळी येथील सौ. नर्मदाबाई काशिनाथ गवळी, विलास काशिनाथ गवळी यांना प्रदान करण्यात आला.