छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर असे नामकरण होऊनही दूध संघाला औरंगाबाद हेच नाव वापरले जात होते. आता औरंगाबाद ऐवजी 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघ' असे अधिकृतरीत्या नामकरण करण्यात आले.
शुक्रवारी झालेल्या दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. सभेत दुधाच्या दरवाढीवरून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले दूध उत्पादक आक्रमक झाले होते. सध्या दूध संघ दुधाला ३० रुपये भाव देत आहे.
१ ऑक्टोबरपासून शासनाच्या आदेशानुसार, आणखी दोन रुपये भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय दूध संघाने १ रुपया दरवाढ करावी, असा आग्रह धरण्यात आला होता.
संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत हे यासंबंधी बोलत असताना दूध उत्पादकांनी हा आग्रह जोरदारपणे रेटला. दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप निरपळ पाटील हेच सभेत प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यातून त्यांचाही अभ्यास दिसून येत होता.
पूर्वीचे कार्यकारी संचालक पाटील हे प्रश्नांना उत्तरे देत राहायचे. आताचे कार्यकारी संचालक सुरेश पहाडिया यांनी काही प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामुळे सभासदांचे शंकानिरसनही होत होते. परंतु, बरीच उत्तरे लेखाधिकारी गणेश धोत्रे यांनाच द्यावी लागली.
काहीवेळा खा. डॉ. कल्याण काळे यांनाही हस्तक्षेप करावा लागला. दूध संघाची संकलन क्षमता १ लाख लिटरची आहे. ती पूर्ण व्हायला पाहिजे, अशी सूचना काळे यांनी केली. प्रा. राहुलकुमार ताठे, अजिनाथ सोनवणे, नंदू जाधव या सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
इमारतीचे वय अवघे २१ वर्षे
• दूध संघाची इमारत बांधून अवघी २१ वर्षे झाली आहेत. ती पाडायची असेल तर तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांकडून बांधकामाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी राहुलकुमार ताठे यांनी यावेळी केली. यासाठी त्यांनी 'लोकमत ऍग्रो'च्या बातमीचे कात्रण दाखवले.
• सभेत राज्यपाल झाल्याबद्दल हरिभाऊ बागडे यांचा, खासदार झाल्याबद्दल डॉ. कल्याण काळे व संदीपान भुमरे तसेच पालकमंत्री झाल्याबद्दल अब्दुल सत्तार यांच्या अभिनंदन ठराव संमत करण्यात आला.