देशाच्या इतिहासात एका राज्यात, एका मुख्यमंत्र्यांच्या काळात चार कृषी विद्यापीठे स्थापन होणे ही भारताच्या इतिहासातील पहिली घटना होय. आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेती माती विकासाच्या दृष्टीने यासोबत अनेकही इतिहासात नोंद घेता येईल असे कार्य केले.
अशा या शेतीमाती विकासाचे महामेरू असणार्या वसंतराव नाईक यांची आज सोमवार (दि.०१) रोजी १११ वी जयंती आपण साजरी करत आहोत.
हवामान, बदल, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे बाजारभाव, तुकड्यात वाढत चाललेले शेती क्षेत्र, उत्पादनात होणारी घट या सर्व प्रतिकूलतेत शेती व्यवसाय टिकवायचा असेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे नवे बियाणे विकसित करावे लागणार असून, सामूहिक शेतीची कास धरावी लागणार आहे.
या दृष्टीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती येताच शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने विविध क्रांतिकारी योजनांची आखणी केली. सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण केले. ग्रामीण भागात सभा घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेतले, परंपरागत पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या संदर्भात शास्त्रीय स्वरूपाची नवी दृष्टी दिली.
परिणामः हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली.
शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेती हीच साऱ्या उद्योगाची जननी आहे. शेती मोडली तर अर्थव्यवस्था मोडू शकते याची तत्यांना जाणीव होती. म्हणून शेती ही उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून केल्या गेली पाहिजे.
कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित बी-बियानांची, रासायनिक खताची आणि शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, या दृष्टीने संशोधनावर भर देण्यात आला. यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राहुरी, विदर्भात अकोला, मराठवाड्यात परभणी आणि कोकणात दापोली येथे कृषी विद्यापीठ स्थापना केली आणि महाराष्ट्राचा विभागीय समतोल साधला.
बियाणे, पीक पद्धती, हवामान, अशा विविध त्या विकासात आधुनिक तंत्रज्ञान आणत आज राज्यातील कृषी विद्यापीठे कार्य करत आहे. या आजच्या प्रगतीचा आणि आजपर्यंतच्या वाटचालीचा महामेरू म्हणजेच वसंराव नाईक होय.