देशांतर्गत साखर टंचाईशी लढत असताना भारत ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन रोखण्याचा विचार करत आहे. स्थानिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवण्यावर अंकुश ठेवण्याची योजना असल्याचे सरकारी आणि व्यापारी सूत्रांनी दिल्याची माहिती रॉयटर्सने दिली.
सध्याच्या हंगामात जैवइंधन तयार करण्यासाठी ऊसाच्या रसाचा वापर मर्यादित करण्याच्या प्रस्तावावर अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
साखर उत्पादन घसरले
यंदा कमी पावसामुळे भारतातील ऊस उत्पादन घसरले आहे. महाराष्ट्रातील पश्चिमेकडील तसेच दक्षिण कर्नाटक राज्यात पडलेल्या पावसाने साखर उत्पादनाबाबत चिंता वाढवली आहे. परिणामी, साखरेचा साठा नियंत्रित करण्यासाठी इथेनॉलला दिली जाणारी साखर रोखण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे साखरेचा साठा आणखी घसरणार नाही अशी आशा आहे.
भारतातील इंधन विक्रेते पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदी करतात.मागणी पुरवठ्याच्या परिस्थितीचे मुल्यांकन केल्यानंतर मंत्र्यांच्या समितीने साखर उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन या संस्थेने गेल्या महिन्यात दिलेल्या दाखल्यानुसार, या वर्षात साखर उत्पादन ८ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारात साखरेच्या किमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इथेनॉलसाठी साखर नको
मिंटच्या वृत्तानुसार, साखरेच्या साठ्यात होणारी घसरण रोखण्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि साखर सिरप वापरण्यापासून परवृत्त करण्याचे निर्देश ग्राहक व्यवहार मंत्रालयाने साखर कारखान्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे इथेनॉल साठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.