पुणे: केंद्र सरकारने यंदाच्या ऊस गाळप हंगामात उसाचा रस, साखरेचा पाक व बी हेवी मोलॅसिससह सर्वच कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतल्याने अतिरिक्त ४०२ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे.
साखर कारखान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला असून इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २४ हजार ७२० कोटी रुपये मिळणार आहेत.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी ६ डिसेंबर अचानक उसाचा रस, साखरेचा पाक व बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली. याचा विपरीत परिणाम साखर कारखानदारीवर झाला.
७.५ लाख टन बी हेवी मोलॅसिसचा वापर• या निर्णयावर टीका झाल्यानंतर १५ डिसेंबरच्या निर्णयानुसार त्यात अंशतः शिथिलता आणण्यात आली. तर यंदा २४ एप्रिलला दिलेल्या निर्णयानुसार कारखान्यांकडील जवळपास साडेसात लाख टन बी हेवी मोलॅसिसचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची परवानगी दिली.• या निर्णयामुळे तेल कंपन्यांकडून २०२३-२४ मध्ये केवळ ५०५ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी झाली. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १३.३ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.
पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंतचे उद्दिष्ट• पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २०२५-२६ अखेर २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्यानेच केंद्र सरकारने गुरुवारी घेतलेल्या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनवाढीसाठी आणि त्या प्रमाणात साखरेचा वापर वळविण्यासाठी होणार आहे. परिणामी यातून कारखान्यांचे आर्थिक चक्र सुधारण्यात मोठी मदत होणार आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.• महासंघाच्या प्रयत्नामुळे २४ एप्रिलच्या अध्यादेशाद्वारे केंद्र सरकारने कारखान्यांकडील जवळपास साडेसात लाख टन बी हेवी मोलॅसिसचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची परवानगी दिली आहे. या इथेनॉलची खरेदी तेल कंपन्यांकडून १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या तिमाहीत होणार असून त्यातून कारखान्यांना सुमारे २ हजार ३०० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
९३ सहकारी साखर कारखान्यांच्या आसवानी प्रकल्पाच्या यंत्रसामग्रीत आवश्यक ते बदल करून मोलॅसिस संपल्यानंतर दोन-तीन महिन्यांत मक्याचा वापर इथेनॉल निर्मितीकडे केल्यास त्यातून अधिकचे उत्पन्न मिळविता येणार आहे. त्यामुळे या ९३ कारखान्यांच्या प्रकल्पांना केंद्र सरकारची व्याज सवलत योजना लागू करण्याबाबत महासंघाचे प्रयत्न चालू आहेत. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ