चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तशा आशयाचा आदेश केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केला आहे. नवा गाळप हंगाम सुरू होण्याला महिनाभर राहिला असतानाच झालेला हा निर्णय साखर कारखान्यांसाठी दिलासादायक आहे.
देशातील साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेमुळे केंद्र सरकारने गेल्या डिसेंबरमध्ये उसाच्या रसापासून तसेच बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा पुरेसा साठा शिल्लक आहे. तसेच आगामी हंगामातही ३३० लाख टनापेक्षा जादा साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे बंदी उठविण्याचा हा निर्णय घेतला आहे.
इथेनॉलसाठी २३ लाख टन तांदूळ मिळणार !भारतीय अन्न महामंडळाकडून केल्या जाणाऱ्या तांदळाच्या ई लिलावात डिस्टिलरीजबरोबर खासगी व्यापाऱ्यांनाही सशर्त सहभागी होता येणार आहे. मात्र त्यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान दर आठवड्याला होणाऱ्या अंतिम लिलावाच्या दरानुसार तांदूळ उचलणे बंधनकारक आहे. तेल कंपन्यांशी झालेल्या कराराच्या प्रमाणात तांदूळ उचलण्यास परवानगी दिली जाणार आहे. हा तांदूळ जास्तीत जास्त २३ लाख टन असू शकतो, असेही दुसऱ्या एका परिपत्रकात केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे.
केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध उठविल्याने साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या फार मोठ्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होऊन साखर उद्योगास दिलासा मिळेल. - पी. जी. मेढे साखर उद्योग अभ्यासक
अधिक वाचा: Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर