कांद्याचे दर पडल्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करूनही आजवर छदामही त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आजघडीला जवळपास साडेतीनशे क्विंटल कांदा अनुदानाच्या तक्रारी धडकल्या आहेत. त्यामुळे या कांद्याचे अनुदान गेले कुठे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
भूम तालुक्यात मागील काही वर्षांत कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. २०२३ मध्ये कांदाबाजारपेठेत दाखल होताच केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे दर कोसळले होते. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला होता. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. यासाठी बाजार समितीकडे अर्ज केले होते.
यानंतर काहींच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली. मात्र, आजही सुमारे साडेतीनशे क्विंटल कांद्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने प्रशासनाकडे तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. पात्र असतानाही अनुदान का आले नाही, असा सवाल शेतकरी करताहेत.
अन्यथा आंदोलन करावे लागेल...
कांदा अनुदानासाठी अर्ज केले. काहींच्या अर्जात त्रुटी निघाल्या. त्याची आम्ही पूर्तता केली. मागील काही महिन्यांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र, आजवर अनुदान काही मिळालेले नाही. सुमारे साडेतीनशे क्विंटल अनुदानाची रक्कम नेमकी गेली कुठे, याचा शोध प्रशासनाने घ्यावा. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही संबंधित शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
मी खरीप हंगामात २०२३ मध्ये कांदा लागवड केली होती. त्यावेळी कांद्याला योग्य दर नसल्यामुळे लागवडीपासून झालेला खर्च निघाला नव्हता. यानंतर सरकारने अनुदान जाहीर केले. अनुदान मिळावे, म्हणून बाजार समितीकडे रीतसर अर्ज केला. मात्र, आजवर छदामही मिळाला नाही. - जनकराजे बाराते, कांदा उत्पादक शेतकरी, भूम.
हेही वाचा - आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी