Join us

उत्पादन चांगले असतांनाही; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ लाख क्विंटलची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 6:30 PM

कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी हेक्टरी ४० क्विंटल धानाचे उत्पादन झाले. त्यामुळे खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर ४० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता, मात्र यात १५ लाख क्विंटलची घट झाल्याने शेतकर्‍यांनी शासकीय खरेदी कडे का पाठ फिरवली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यात धानाच्या उत्पादनात वाढ झाली. कृषी विभागाच्या अंदाजानुसार हेक्टरी ४० क्विंटल धानाचे उत्पादन झाले. त्यामुळे खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर ४० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता, तर मागील वर्षीसुद्धा खरिपात ४० लाख क्विंटल धान खरेदी झाली होती; पण यंदा खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर केवळ २४ लाख ७५ हजार क्विंटल धान खरेदी झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत यात १५ लाख क्विंटलने घट झाली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन खरीप हंगामात एकूण १८३ केंद्रावरून ८० हजार ७४० शेतकऱ्यांकडून २४ लाख ७५ हजार ५९५ क्विंटल धान खरेदी केली आहे.

खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ५४० कोटी रुपये असून यापैकी ५१३ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा केले असून १७ कोटी रुपयांचे चुकारे ३१८१ शेतकऱ्यांना करणे बाकी आहे.

विशेष शासनाने धान खरेदीला दोनदा मुदतवाढ दिली; पण यानंतरही धान खरेदीच्या आकड्यात वाढ होत नसल्याचे चित्र आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत धान खरेदीत १५ लाख क्विंटलने घट झाल्याने मोठ्या प्रमाणात धान शेतकऱ्यांनी बाहेर विक्री केल्याचे बोलल्या जाते. खरीप हंगामात तब्बल दोन महिने उशिरा धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा परिणामसुद्धा धान खरेदीवर झाल्याचे बोलल्या जाते.

१ लाख २५ हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ

शासनाने धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली. याचा लाभ केवळ शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार असल्याचे शासनाने आधीच स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १२९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून एवढ्याच शेतकयांना शासनाच्या बोनसचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२४ लाख ७५ हजार क्विंटल धान उघड्यावरच

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाईसाठी अद्यापही उचल करण्यात आली नाही. राइस मिलर्सने करारनाम्याला घेऊन धान खरेदीवर मागील चार महिन्यां- पासून बहिष्कार टाकला आहे; पण शासनाने यावर अद्यापही तोडगा काढला नाही. परिणामी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या २४ लाख ७५ हजार क्चिटल धान तसाच केंद्रावर उघड्यावर पडला आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतीशेतकरीगोंदिया