खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून एक रुपयात पीक विमा भरून घेण्यात आला. हंगाम उलटला, रब्बी हंगाम सुरू झाला. मात्र, जवळपास ८० हजार शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भारतीय कृषी विमा कंपनीस्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे अर्ज कधी मंजूर होणार व अग्रिम कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना या वर्षीपासून सुरू केली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १८ लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. जुलै महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या, तर पुढे पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाल्याने अग्रिम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती. दुसरीकडे पीक विमा कंपनीने राज्य सचिवापर्यंत अग्रिम देण्याबाबत आक्षेप घेतला होता.
जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले गेले. त्यामुळे पीक विमा अग्रिमचा मार्ग मोकळा झाला, शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या, दिवाळीमध्ये ७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम जमा झाला. परंतु, जवळपास ८० हजार शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज पीक विमा कंपनीस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पडताळणीअभावी ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले नाहीत, त्यांना किमान महिनाभर तरी वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, खरीप पीकविम्याबाबत ऑनलाइन पाहणी करणाऱ्यांना 'व्हेरीफिकेशन पेंडींग' असा संदेश मिळत आहे.
कशामुळे अर्ज आहेत प्रलंबित ?
■ एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सेवा सुविधा केंद्र अर्थात सीएससी, बँका येथून शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करताना कागदपत्रांची आवश्यकता असते.
■ आवश्यक ती कागदपत्रे दिल्यानंतर संबंधित अर्ज पीक विमा कंपनीकडे दाखल होतो. पुढे, पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करते. कागदपत्रे योग्य असतील तरच शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर होतो.
■ दरम्यान, आता अग्रिम देण्याची वेळ आली असताना सोयाबीनसह इतर पिकांचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज कंपनीस्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्ह्यातील तालुका व खेड्यापाड्यात सेवा सुविधा केंद्र सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी गावानजीक असलेल्या सीएससीमधून खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. पीक विमा अग्रिम मंजूर झाला आहे. परंतु, रक्कम बँक खात्यावर जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांनी सीएससीवर जाऊन माहिती घेतली असता त्यांचा अर्ज विमा कंपनीस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे समजून आले. आता हे अर्ज कधी मंजूर होणार व कधी अग्रिम मिळणार, याची विचारणा सीएससी चालकांना केली जात आहेत. शेतकऱ्यांचा हा प्रश्न सीएससी चालकांकडून विमा कंपनीपुढे मांडला जात असून, तो त्वरित निकाली काढण्याची मागणी केली जात आहे.
२१ दिवसांहून अधिक कालावधीसाठी मराठवाड्यात पावासाचा खंड झाला. परिणामी, झालेल्या नुकसानासाठी पीक विम्यातील काही रक्कम मदत म्हणून आधी द्या म्हणजेच अग्रिम पीकविमा देण्याची अधिसूचना काढण्यात आली. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना अग्रिमचे पैसे मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे अग्रिमचा उद्देशच पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.