Crop Insurance : मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची कोट्यवधी रुपयांची मदत चक्क पात्र लाभार्थी नसलेल्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे.
या प्रकरणात आता जळगाव जामोद तालुक्यातील ८० जणांना नोटीस बजावून त्यांची तहसीलमध्ये सुनावणी घेण्यात आली असून, ज्यांनी हा कारनामा केला, त्या तलाठ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तलाठ्यांनीच पात्र नसलेल्या लाभार्थी तसेच स्वतःच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या मदतीची ही रक्कम जमा केल्याची चर्चा असून, तसा आरोपही होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
परिणामी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी २२ जुलै रोजी संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी होऊन तब्बल ७२ हजार ४६४ हेक्टरवरील शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले होते.
२४ गावांना फटका बसला असून २ हजार २८६ जण या अतिवृष्टीमध्ये बेघर झाले होते. दोन्ही तालुक्यांतील २१५ गावे व त्या लगतच्या परिसराला मोठा फटका बसला होता.
नैसर्गिक आपत्तीची ही व्याप्ती पाहता राज्य शासनानेही नुकसानग्रस्तांना सढळ हाताने मदत केली. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील काहींनी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांच्या नावे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाची रक्कम वळती करण्यात आल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी जळगाव जामोदचे माजी नगराध्यक्ष गजानन वाघ यांनीही राज्य शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला असून आता एक एक बाब समोर येत आहे.
दोन तलाठ्यांना कारणे दाखवा
प्राथमिकस्तरावर सध्या जळगाव जामोद तालुक्यातील दोन तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय होती? हे प्रत्यक्ष चौकशीअंती स्पष्ट होईल. मात्र, प्रशासकीय पातळीवर हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
८० जणांना बजावल्या नोटीस
या प्रकरणी पडताळणीमध्ये लाभार्थी नसलेल्या ८० जणांची नावे समोर आली असून, यात आणखी काहींची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली असून, संबंधित रक्कम ही शासनाच्या खात्यात जमा करण्याचे सूचित केले आहे.
जमा केलेल्या रकमेची पोच घेऊन तहसील कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहण्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहे.
३० लाख शासकीय खात्यात जमा
जळगाव जामोद तालुक्यातील झालेल्या या गैरप्रकारातील ३० लाख रुपयांची रक्कम संबंधित पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना नोटीसमध्ये कायदेशीर कारवाईची तंबी दिल्यानतंर जमा केली आहे. गुरुवार सायंकाळी आणखी दोन लाख रुपये शासकीय खात्यात जमा झाल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे एकूण ३२ लाख रुपये आतापर्यंत पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनी जमा केले आहेत. या प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सोबतच प्रकरणाच्या चौकशीत दोन तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित लाभार्थ्यांची सुनावणीही घेण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्यक्षात किती रक्कम अशा पद्धतीने दुसऱ्या खात्यात जमा झाली आहे हे स्पष्ट होईल.
आतापर्यंत ३२ लाख रुपये जमा
आतापर्यंत ३२ लाख रुपये अशा लाभार्थ्यांकडून जमा करण्यात आले आहेत. सुनावणी दरम्यान ज्याच्या खात्यात रक्कम वळती झाली आहे त्याचे खरचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे का? याचीही पडताळणी आम्ही करत आहोत.- शीतल सोलाट, तहसीलदार जळगाव जामोद