Join us

कृषी पंप वगळता इतर पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचा खर्च आता महावितरण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 11:40 AM

कृषिपंप वगळता इतर सर्व वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी व वीजभार वाढवून देण्यासाठी तसेच आवश्यक पायाभूत वीज यंत्रणेचा खर्च आता ...

कृषिपंप वगळता इतर सर्व वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी व वीजभार वाढवून देण्यासाठी तसेच आवश्यक पायाभूत वीज यंत्रणेचा खर्च आता महावितरणकडून करण्यात येणार आहे. काही ठिकाणी योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीस महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना यासंबंधी सक्त निर्देश दिले आहेत.

नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी, ग्राहक योगदान व परतावा तसेच समर्पित वितरण सुविधा अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी, नवीन सेवा जोडणी योजना अस्तित्वात आहे.

या योजनेत नवीन वीजजोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही, केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहित्र, स्विच गिअर्स, वीज वाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी तसेच ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणची

■ ग्राहक योगदान व परतावा योजनेमध्ये ग्राहक स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे व देखरेखीखाली आवश्यक पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात.

■ तसेच समर्पित वितरण सुविधा योजनेमध्ये बांधकाम व्यावसायिक ग्राहकांनी स्वस्वचनि परवानाधारक विद्युत कंत्राटदारांकडून स्वतंत्र वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, उपकेंद्र, क्षमतावाढ आदी पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम केल्यास या वीज यंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी राहते.

■ देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे असणार आहे.

 

टॅग्स :वीज