नितीन चौधरी
पुणे: शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत.
त्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण विभागाचा समावेश करण्यात आला असून, हे चारही प्रकल्प समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणार आहेत.
त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या उपक्रमांतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार असून, पहिल्या हबचे भूमिपूजन लवकरच करण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्देशाने उद्योगांसाठी नवी मुंबई व पुण्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहेत.
तर वर्धा व नागपूर येथे राष्ट्रीय तर पाच ठिकाणी प्रादेशिक व २५ जिल्ह्यांत जिल्हा लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहेत. यातच शेती क्षेत्रालाही सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. शेतमालावर प्रक्रिया करून तो निर्यातक्षम तयार करण्यासाठी या हबचा वापर केला जाणार आहे.
त्यासाठी राज्याच्या चारही महत्त्वाच्या विभागांना सामावून घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकार स्तरावर नियोजन केले जात आहे.
नाशवंत मालाची वाहतूक
१) विशेष म्हणजे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई रस्ता सेवा आता जलदगतीने होऊ लागली आहे. याचाच फायदा घेत नाशवंत शेतमालाची वाहतूक वेगाने करण्यासाठी या महामार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
२) या महामार्गालगत राज्यातील नागपूर विभागात नागपूरला मराठवाडा विभागात संभाजीनगर, पुणे विभागात तळेगाव व कोकण विभागात भिवंडी येथे उभारण्यात येणारे ॲग्रो लॉजिस्टिक हब आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने करण्यात येईल.
३) पणन विभागाच्या मॅग्नेट प्रकल्पात याची उभारणी करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांनी तळेगाव येथील १०० एकर जागेची पाहणी केली आहे. तळेगाव उद्यानविद्या तंत्रज्ञान केंद्राशेजारीच ही जागा असून, येथून फुलांच्या निर्यातीसाठी या हबचा वापर होईल.
प्रत्येक हबसाठी १०० कोटी गुंतवणुकीचा असेल प्रस्ताव
हबमध्ये गोदाम, सायलोज, ग्रेडिंग युनिट, ट्रक महामंडळ, पुणे टर्मिनल, पेट्रोलपंप व इतर कॉमन फॅसिलिटीसाठी प्रत्येक हबसाठी १०० कोटी रक्कम गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल. संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे ॲग्रो लॉजिस्टिक हबचे ४५ दिवसांत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.