Join us

भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ; पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 3:29 PM

भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे.

भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे.

आजपर्यंत ज्वारी खरेदीला मुदतवाढ नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीविना होती. आता मुदतवाढ मिळूनही साठा करण्यासाठी गोदाम उपलब्ध झाले नसल्याने १४ दिवसांत ४४० शेतकऱ्यांच्या ज्वारीची तोलाई होईल का, याबाबत साशंकता आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीसाठी चिखली व जलधरा खरेदी केंद्रावर ७३२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. ३० जून ही ज्वारी खरेदीची शेवटची तारीख असल्याने ३० जूनपर्यंत जलधरा खरेदी केंद्रावर १३९ शेतकऱ्यांची ९ हजार ६१२ क्विंटल, तर चिखली खरेदी केंद्रावर १५३ शेतकऱ्यांची ९ हजार १६६ क्विंटल ज्वारी खरेदी केली.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे गोदामाची परवानगी मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला असल्याची माहिती आहे. अजूनही गोदाम उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने मुदतवाढ मिळून उद्दिष्ट येऊन उपयोग काय? असे शेतकरी बोलू लागले आहेत.

११ जुलैला मिळाली खरेदी आराखड्यास मुदतवाढ

■ जूनच्या शेवटी अभिकर्ता आदिवासी विकास महामंडळाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव यांना ज्वारीच्या वाढीव स्वरेदी आराखड्यास मुदतवाढ मंजुरी मिळावी, असा पत्रव्यवहार केला होता. कशीबशी ज्वारी खरेदीला ११ जुलै रोजी मुदतवाढ मिळाली.

■ सहा दिवसांचा कालावधी लोटला तरी गोदाम उपलब्ध झाले नाही. खरेदी केलेल्या ज्वारीची साठवणूक करण्यासाठी गोदामच नसल्याने मुदतवाढ व उद्दिष्ट येऊनही काही उपयोग झाला नसल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

हेही वाचा - ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकज्वारीबाजारनांदेडनांदेडकिनवट