राज्यातील कृषी विभागातील कृषी सेवक पदासाठी अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. तब्बल 952 जागांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेत कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी केले आहे.
कृषी आयुक्तालयाच्या 11 सप्टेंबर 2023 रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांना https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याबाबतच्या सर्व सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे नाईकवाडे यांनी कळविले आहे.
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील 'गट क' संवर्गात कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यात येत आहेत. याआधी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून कृषी सेवक पद भरतीसाठी 3 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित वृत्त: कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत
या जाहिरातींच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक पदासाठी पात्र उमेदवारांकडून नमूद पदांच्या परीक्षेसाठी दोन्ही भाषांमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात विचारणा होत होती. त्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावर वारंवार निवेदने विनंती अर्ज येत होते. या निवेदनांच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक पदांसाठी कृषी सेवक पदांची परीक्षा ही दोन्ही भाषेत म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकही कृषी विभागाने जारी केले आहे.