बाजार समितीत शेतमालाची विक्री केल्यानंतर वजन झाल्यावर अडत्यांनी त्याचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने देणे बंधनकारक करण्याचे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी काढले आहेत. पैसे न दिल्यास संबंधित अडत्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्याने बाजार शेतमालाची विक्री केल्यानंतर अडत्यांनी वजन होताच तातडीने शेतमालाचे पैसे देणे अपेक्षित आहे. काही बाजार समित्यांमध्ये मात्र, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आणि त्याचे वजन झाल्यानंतर अडत्यांकडून त्यांना त्याच दिवशी रक्कम दिली जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी पणन संचालनालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्याशिवाय अडत्यांकडून शेतमालाची योग्य किंमत मिळत नाही किंवा विक्री किंमत दिली जात नाही. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. तसेच काही ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून माल खरेदी करून त्याची विक्री किंमत न देता फसवणूक करून पळून जातात, अशाही तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पणन संचालक शैलेश कोतमिरे यांनी हे आदेश दिले.
अनामत रकमेतून पैसे द्या
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल किंवा त्यांच्या शेतमालाच्या विक्रीएवढी रक्कम मिळत नसल्याचे आढळल्यास त्या संदर्भात बाजार समितीने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत बाजारातील अडत्यांच्या हिशेबाच्या पुस्तकांची नियतकालिक तपासणी करावी. त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेशही कोतमिरे यांनी काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत. एखाद्या व्यापायाने शेतकऱ्याला पेंस दिले नसल्याचे आढळल्यास व्यापायाने बाजार समितीकडे ठेवलेल्या अनामत रकमेतून ते देण्यास किंवा ज्या बँकेने हमी दिली आहे, त्या बँकेस ते पैसे देण्याविषयीचे आदेश द्यावेत, अशी कायद्यात तरतूद आहे.
बाजार समित्यांवरही जबाबदारी
या आदेशांनुसार बाजार समितीनेही बाजाराच्या आवारात शेतमालाचे लिलाव झाल्यानंतर त्याच दिवशी आवारातील सर्व व्यापारी, अडत्यांकडे जाऊन किती शेतमालाची खरेदी झाली, त्याची विक्री किंमत काय तसेच शेतमालाची समितीत शेतकऱ्यांना किती किंमत अदा केली, याची माहिती घेणे आवश्यक आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बाजार समितीतील अडत्यांवर वेळीच कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या संदर्भात सहकारी संस्थांच्या जिल्हा निबंधक तसेच सहायक निबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बाजार समित्यांमध्ये वारंवार भेटी द्याव्यात. बाजार समितीत खरेदी विक्री झालेल्या शेतमालाची किंमत शेतकऱ्यांना योग्य वेळी दिली जाते किंवा कसे याबाबत खात्री करावी. परिपत्रकाचे पालन होते की नाही, याची खातरजमा करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शेतमाल विकताच तातडीने पैसे न देणे अडत्यांना पडणार महागात
पणन संचालकांकडून होणार कारवाई; शेतकऱ्यांना दिलासा
पणन संचालकांकडून होणार कारवाई; शेतकऱ्यांना दिलासा
Join usNext