Join us

Fake Fertilizer: गुजरातच्या बनावट खताची महाराष्ट्रात विक्री गोदाम केले सील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 10:06 AM

राजकोट (गुजरात) येथील खतनिर्मिती कंपनीने बनावट खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माथी मारून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सोलापूर : राजकोट (गुजरात) येथील खतनिर्मिती कंपनीने बनावट खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माथी मारून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खत उत्पादन करणारी कंपनी आणि कासेगाव येथील खत विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिवच्या कृषी अधीक्षक कार्यालयाने तामलवाडी (ता. तुळजापूर) येथील गोदाम सील केले आहे. तामलवाडी येथे एका गोदामात रासायनिक खताचा अनधिकृत साठा असल्याची माहिती अज्ञाताने धाराशिवच्या जिल्हा कृषी अधीक्षकांना दिली.

धाराशिवचे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गोदामावर धाड टाकली गोदामात गुजरातच्या कंपनीचे ४०० पोती (२० मे. टन) बनावट १०:२६:२६ रासायनिक खत आढळून आले.

या खताच्या साठ्याची कुठेही नोंद नव्हती. गोदाम महादेव लक्ष्मण चौगुले (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. या खतांची बाजारभावाप्रमाणे ५ लाख ८८ हजार रुपये किंमत करण्यात आली आहे.

प्रवीण पाटील यांनी गोदामातील बनावट खत साठ्याप्रकरणी गोदामाचे मालक महादेव चौगुले आणि राजकोटची कृषी केमिकल अॅड फर्टिलायझर या खत उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

दुतामलवाडी पोलिस ठाण्यात अनधिकृत विनापरवाना बनावट खताची साठवणूक केल्याने अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने संबंधित गोदाम सील केले असून, गोदामातील अन्य खते, औषधांची झाडाझडती घेतली.

१५० रुपयांचे जिप्सम १४५० रुपयांनाराजकोटच्या कंपनीने जिप्समच्या गोळ्या करून आकर्षक पॅकिंगच्या पोत्यात ते भरले. त्यावर एनपीके १०:२६:२६ छापून त्याची बाजारात विक्री केली. वास्तविक, त्यातील जिप्समची किंमत १५० (५० कि. बॅग) असून, खर्चासहित दोनशे रुपये होऊ शकते. मात्र, कंपनीने १४५० रुपये किंमत छापून त्याची विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले.

कासेगावच्या कृषी केंद्राची तपासणी केली. तपासणीत बनावट रासायनिक खताची पोती आढळून आली नाहीत. अन्य बनावट औषधे आणि खते या दुकानात नव्हती तरीदेखील दुकान मालक महादेव चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खत विक्री दुकान सील करण्यात आले आहे. - दत्तात्रय गवसाने, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी

टॅग्स :खतेगुजरातशेतीशेतकरीसरकारराज्य सरकारसोलापूरसेंद्रिय खततुळजापूर