Fake Fertilizers seeds :
छत्रपती संभाजीनगर : बनावट आणि विनापरवाना बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या १० विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने गुन्हे नोंदविले आहेत. मागील पाच महिन्यांत छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यांत ही कारवाई झाल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली.
वैजापूर शहरात कृषी विभागाने मे महिन्यात छापा टाकून नाथ बायोजोन्स कंपनीच्या अनधिकृत विक्रेत्याला सरकी बियाण्यांची विक्री करताना पकडले होते.
या प्रकरणी वैजापूर ठाण्यात ज्ञानेश्वर बकाळे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
जूनमध्ये पैठण तालुक्यात गुजरातच्या व्यापाऱ्याने कुरिअरने पाठविलेले बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते. या प्रकरणी परेशकुमार अश्विनभाई पटेल याच्या विरोधात पैठण ठाण्यात गुन्हा नोंद झाला, गंगापूर तालुक्यात बनावट कापूस बियाणे विक्री केल्याप्रकरणी आकाश अप्पासाहेब सुकासे, भूषण रामेश्वर पाटील, विशाल बाबासाहेब पाठे, पवन सोपान बोरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता.
अंबड येथे जादा दराने सरकी बियाणे विक्री करताना अनिल रामा गायकवाड, पांडुरंग धर्मराज शेळके, डोमश्वेर कृषी सेवा केंद्र, अंबड यांच्याविरोधात गुन्हे नोंद झाले.
बीडमध्ये तलवाडा येथे रमेश प्रभाकर डरफे या विक्रेत्यावर जादा दराने बियाणे विक्रीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे विभागीय गुणनियंत्रण अधिकारी काळुसे यांनी सांगितले.
खतविक्रेत्यांवर कारवाई
• महाराष्ट्रात खतविक्रीचा परवाना नसताना जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना घरपोच रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या कंपनीच्या विक्रेत्यावर कृषी विभागाने पोलिसांत कारवाई केली. एम. एस. ग्रीन फेनिलाइझर्स प्रा. लि. कंपनीचे विक्रेते श्रावण लिंबाजी सांगळे यांच्याविरोधात ३० मे रोजी गुन्हा नोंदविला होता.
• जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका शेतात रासायनिक खताच्या तब्बल २ हजार गोण्या फेकून देत निसर्गाला नुकसान पोहोचविल्याप्रकरणी गुजरातच्या सरदार केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर कंपनी आणि त्यांचा विक्रेता गणेश गवतेवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
• वैजापूर येथील आकाश सोमनाथ जगताप आणि अन्य आरोपी नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये बनावट खते भरून विनापरवाना गोदामात साठवत होते. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविला.
बंदी असलेले कीटकनाशक
• जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गणराज अॅग्रो ट्रेडर्सचे मालक श्रीराम कारभारी जन्हाड यांनी त्यांच्या दुकानात केंद्र सरकारने बंदी घातलेले कीटकनाशक विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.
• या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी जहाडविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविला.
बनावट खत ओळखण्यासाठी 'या' करा उपाययोजना
* योग्य लेबलिंग आणि पॅकेजिंग तपासा यात ब्रँड नाव, निर्मात्याचा पत्ता, पौष्टिक रचना, शिफारस केलेल्या वापर सुचना, बॅच किंवा लॉट नंबर आणि कालबाह्यता तारीख यासारखी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे. बनावट खतामध्ये या गोष्टींचा अभाव असतो. अशा परिस्थितीत खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
* उत्पादक तपासा करताना नामांकित उत्पादक किंवा अधिकृत डीलर्सकडून खते खरेदी करा. उत्पादनाची पडताळणी करण्यासाठी किंवा अधिकृत विक्रेत्यांची यादी मिळवण्यासाठी, निर्मात्याच्या वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क साधा.
* खत खरेदी करताना पोतचा विचार करताना योग्य खतांमध्ये साधारणपणे एकसमान पोत, रंग आणि आकार असतो. तुम्हाला असामान्य पोत, असामान्य रंग किंवा जास्त धूळ दिसल्यास, हे नकली (खोटे) उत्पादन असल्याचे सूचित करू शकते.
* वासाचे मूल्यमापन करताना खऱ्या खतांमध्ये अनेकदा वेगळा पण तिखट वास नसतो जो त्यांच्या बाह्य घटकांशी संबंधित असतो. जर कंपोस्टला असामान्यपणे तीव्र किंवा विशिष्ट गंध असेल तर ते बनावट उत्पादनाचे लक्षण असू शकते.
* विद्राव्यता चाचणी करताना पाण्यात कमी प्रमाणात खत विरघळवा. वास्तविक खते कमीत कमी अवशेष सोडून सहज विरघळली पाहिजेत. कृत्रिम खते हळूहळू विरघळू शकतात, लक्षणीय अवशेष सोडू शकतात किंवा पाण्यात मिसळल्यावर असामान्य प्रतिक्रिया निर्माण करू शकतात.