पुणे : यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जापैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत.
प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी विभागाने केलेल्या पडताळणीतून स्पष्ट झाले आहे.
या अपात्र अर्जाद्वारे तब्बल ९ हजार ६५२ हेक्टर क्षेत्रावर बनावट फळपीक विमा काढण्यात आला होता. हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण १३ कोटी ६० लाख रुपयांचा विमा हप्ता वाचला आहे. या अपात्र अर्जामध्ये सर्वाधिक ७ हजार ३३४ अर्ज जालना जिल्ह्यातील आहेत.
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहारात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी या १३ फळपिकांसाठी ही योजना लागू होती.
त्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै होती. त्यानुसार राज्यात ७३ हजार ६८६ अर्ज आले होते. मात्र, प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आले.
त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर पडताळणी करण्यात आली. त्यात १६ हजार ६२० ठिकाणी बागांची लागवड झाली नसल्याचे, तसेच प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा काढण्यात आल्याचेही दिसून आले.
काही ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना, त्याचाही विमा काढला असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कृषी विभागाने हे अर्ज अपात्र ठरविले आहेत. संबंधित शेतकऱ्यांचा ६ कोटी ८८ लाख रुपयांचा विमा हप्ता जप्त करण्यात आला असून, तो केंद्र सरकारकडे जमा करण्यात आला आहे.
या अपात्र अर्जाद्वारे ९,६५२.३२ हेक्टरवरील पिकांचा बनावट विमा उतरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, तर एकूण १३ कोटी ६० रुपयांचा विमा हप्त्याची बचत झाली आहे.
त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा ६ कोटी ८८ कोटी, राज्य सरकारचा हिस्सा ३ कोटी ४० लाख, तर केंद्र सरकारचा हिस्सा ३.३२ कोटी रुपये आहे. या अपात्र अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील आहे.
जिल्ह्यात एकूण १८ हजार ९२२ अर्ज आले होते. त्यातील ७ हजार ३३४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्याखालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यात ३ हजार ११६ अपात्र ठरले आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात २ हजार २९७ अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.
राज्यातील विम्याची आकडेवारी
जिल्हा | अपात्र अर्ज | वाचलेला विमा हप्ता (रुपयांत) |
अकोला | १७ | ५९,३६० |
अमरावती | ५२ | ३,३८,९५० |
संभाजीनगर | १३७२ | १,०८,९५,४१० |
धाराशिव | २६ | ४२,०१० |
नागपूर | ६२ | १,१४,५१० |
परभणी | ८८२ | २,२४,८६,४५३ |
अहिल्यानगर | ३११६ | २,२४,८६,४५३ |
बीड | ५२८ | ४८,८४,५२७ |
बुलढाणा | ३१ | ३,९८,७८१ |
धुळे | ८ | ९५,२३२ |
लातूर | ४ | १९,२२० |
नाशिक | २४८ | १८,३३,०२० |
पालघर | २१ | ३,७८,७९५ |
पुणे | ३८९ | ३२,५२,५६१ |
सांगली | ४३३ | ५८,३७,०५७ |
सातारा | ५३७ | २९,७६,१९६ |
सोलापूर | २२९७ | १,१७,३४,५६७ |
ठाणे | ४९ | ९,७८,१८० |
वाशिम | ५ | २९,०७० |
हिंगोली | १९ | ७९,४०० |
जळगाव | ३६ | १,८५,१६२ |
वर्धा | १ | १,०८० |
जालना | ७,४४३ | ६,९१,९१,०५५ |
एकूण | १६,६२० | ३,६०,४५,०३९ |
अपात्र अर्जाद्वारे भरण्यात आलेला शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता जप्त करण्यात आला असून तो केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी
अधिक वाचा: पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई