नितीन चौधरी
पुणे : यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे.
पडताळणी केलेल्या बागांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्के इतके आहे. अशाच विविध कारणांमुळे सुमारे साडेचौदा हजार अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
अजूनही १८ हजार अर्जाची पडताळणी असून, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे अपात्र अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहारात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी या १३ फळपिकांसाठी ही योजना लागू होती. त्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै होती.
त्यानुसार राज्यात ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. मात्र, प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आले.
त्यानुसार आयुक्तालयातील केलेल्या पडताळणीत एकूण अर्जापैकी सुमारे ४५ हजार अर्जाची प्रत्यक्ष जागेवर पडताळणीत केली. त्यात १० हजार ४७६ ठिकाणी बागांची लागवड झाली नसल्याचे उघड झाले आहे.
तसेच, ३ हजार ८७७ ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा विमा काढण्यात आल्याचेही दिसून आले आहे. तर, १६३ ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना त्याचाही विमा काढला असल्याचे आढळले आहे.
त्यामुळे कृषी विभागाने हे अर्ज अपात्र ठरविले आहेत. संबंधित शेतकऱ्यांचा विमा हप्ता जप्त करण्यात आला असून, तो केंद्र सरकारकडे जमा करण्यात आला आहे.
पुण्यातही बनावट विमा
• पुणे जिल्ह्यातही असाच प्रकार निदर्शनास आला असून, एकूण ९३९ अर्जापैकी ३२८ ठिकाणी बागा प्रत्यक्षात आढळल्या नाहीत. तर, ठाणे जिल्ह्यात आलेल्या ७१ अर्जांपैकी तब्बल ६७ अर्ज अपात्र ठरले असून, केवळ ४ अर्जाना मान्यता देण्यात आली आहे.
• जिल्ह्यात ४९ ठिकाणी बागा नव्हत्या, तर १८ ठिकाणी जादा विमा काढल्याचे दिसून आले आहे. राज्यात आतापर्यंत अपात्र अर्जाची संख्या १४ हजार ५२८ इतकी झाली आहे.
• अजूनही १८ हजार अर्जाची पडताळणी सुरू असून, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अपात्र अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जालन्यात आढळला सर्वाधिक बनावट विमा
सर्वाधिक बनावट विमा जालना जिल्ह्यात आढळला आहे. जिल्ह्यातून या योजनेत १८ हजार ९२२ अर्ज आले होते. त्यापैकी ७ हजार २१७ ठिकाणी फळबागाच आढळल्या नाहीत, तर १८९ ठिकाणी कमी क्षेत्र असताना जादा विमा क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात १३ हजार २८६ अर्ज आले होते. त्यात १ हजार ४९८ ठिकाणी बागा नसणे तर २ हजार ५३५ ठिकाणी जादा विमा काढणे, असे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे येथील अपात्र अर्जाची संख्या ४ हजार ३३ इतकी झाली आहे.
शेतकऱ्यांनी बाग नसताना, तसेच जादा क्षेत्राचाही विमा काढू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल. अर्ज बाद झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा प्रीमियम जप्त करून केंद्र सरकारकडे जमा करण्यात आला आहे. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे