रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ३६,४६५ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले असून, १८०१९.५०३४५ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हप्त्याची एकूण २१ कोटी ७४ लाख ३१ हजार ६५६.१ इतकी रक्कम भरणा केली आहे.
हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे पिकावर परिणाम होऊन उत्पादन अत्यल्प येते. उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नाही. बागायतदारांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना मदतीचा हात म्हणून शासनातर्फे फळपीक विमा योजना राबविण्यात येते.
या फळपीक विमा योजनेत आंबा व काजू या दोन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी उच्चतम तापमान, नीचांकी तापमान, अवेळचा पाऊस हे निकष निश्चित केले असून, फळपीक विमा योजनेचा कालावधी दि १५ मेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
आंबा, काजूचा हंगाम ३० मेपर्यंत असल्याने विमा योजनेचा कालावधी १५ दिवस वाढवून मिळण्याची मागणी बागायतदारांकडून सातत्याने सुरू आहे.
आंबा
एकूण शेतकरी - ३०,१३२
क्षेत्र - १४३८३.५०४७८ (हेक्टर)
शेतकरी हप्ता - १९,५६,१५,६६४.१ रुपये
काजू
एकूण शेतकरी - ६,३३३
क्षेत्र - ३६३५.९९८६७ (हेक्टर)
शेतकरी हप्ता - २,१८,१५,९९२.०२ रुपये
यंत्रणेच्या नादुरुस्तीचा फटका शेतकऱ्यांना
जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांत तापमापक यंत्र बसविण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश तापमापक केंद्रातील ट्रिगर अॅक्टिव्हेट न झाल्याने तापमानाची योग्य नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा परताव्यापासून वंचित राहिले. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल विमा संरक्षक रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाते. मात्र, यंत्रणा अचूक नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून, नुकसान होत आहे.
अधिक वाचा: ऊस टंचाईमुळे देशभरातील ७७ कारखाने पडले बंद; यंदा साखर उत्पादन घटणार