कोल्हापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ या वर्षासाठी अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये बांबूला सर्वाधिक हेक्टरी सात लाख रुपये, तर शेवग्याला १ लाख ३३ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना हे अनुदान मंजूर झाले आहे.
पारंपरिक पिकांच्या उत्पादनामुळे शेतीचा पोत ढासळत आहेच, त्याचबरोबर एकच पीक सगळ्यांनी घेतल्याने त्याचे दर पडतात.
यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्यावतीने नऊ प्रकारच्या फळबागांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा फळबागसाठी पोषक
कोल्हापूर जिल्ह्याचे ४ लाख हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख हेक्टर उसाचे पीक घेतले जाते. त्या पाठोपाठ ९२ हजार हेक्टरवर भात, तर ८० हजार हेक्टरवर भुईमूग व सोयाबीनचे पीक घेतले जाते. या पिकांच्या तुलनेत फळबाग लागवड अवघ्या ११५ हेक्टरवर आहे. येथील वातावरण पाहिले तर आंबा, काजू, बांबू, नारळ, पेरु, शेवगा, लिंबू ही पिके मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकतात.
फळबाग लागवडीसाठी असे मिळणार अनुदान
फळपीक (प्रति हेक्टर) मंजूर अनुदान
आंबा : १,९८,०४२
काजू : १,३५,८३७
बांबू : ७,००,०००
नारळ : १,७०,१०१
पेरु : १,६०,६६०
शेवगा : १,३३,१६९
लिंबू : १,७०,३४०
केळी : २,७९,६००
तुती : ४,१८,८१५
यांना मिळणार लाभ
१) अल्पभूधारक शेतकरी (२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र) अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य.
२) किमान ५ गुंठे ते २ हेक्टरपर्यंत लाभ घेता येतो.
फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. - नामदेव परीट, कृषी उपसंचालक, कोल्हापूर
अधिक वाचा: आता शेतकऱ्यांची तलाठ्यांकडील ही ११ कामे होणार झटपट; वाचा सविस्तर