उन्हाने तापलेल्या हवेत अल्हाद थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला स्पर्श करून जाते. हिरव्या गवताचा पायांना होणारा स्पर्श. स्वच्छ हवा आणि वेगवेगळ्या शेकडो फुलांचा मनमोहक देखावा. रंगीबेरंगी फुलांच्या मधून वाट काढणारे आनंदी चेहरे. ही केवळ कल्पना नाही तर खरच घडतंय आपल्या भारतात.
फुलांचा मंद सुगंध घेत भारताच्या वेगवेगळ्या भागातील लोक एकत्र येत हा अनुभव घेताहेत. वसंत ऋतूचं स्वागत करताहेत. सध्या दिल्ली शहर गुलाबी, जांभळ्या, लाल, पिवळ्या रंगांसह कितीतरी रंगीबेरंगी फुलांनी बहरलंय. वसंत ऋतूच्या आगमगासह इथं सध्या ट्यूलिप महोत्सव सुरु आहे. दोन लाखांहून अधिक फुलांचा नजारा नागरिकांनी पाहिला.
१० फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत तब्बल बारा दिवस चाललेला हा महोत्सव नवी दिल्ली महानगरपालिकेने आयोजित केला होता. इथं असंख्य फुलं नेदरलँड या देशातून आणली होती.तर डच दूतावासानेही ४० हजार ट्यूलप्स पाठवली होती.
गुलाब महोत्सव
चंदीगडच्या झाकीर हुसेन रोज गार्डन मध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गुलाब महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाही या बागेत लाखो गुलाबाची फुलं होती. बागेत फेरफटका मारताना स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव रसिकांनी घेतला. फक्त फुलच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन इथं करण्यात आले होते. तसेच आवडत्या खाद्यपदार्थांसह हेलिकॉप्टरने सहलीचीही व्यवस्था करण्यात आली होती.
उटी फुल महोत्सव
तमिळनाडूच्या उटीमधील शासकीय बॉटनिकल गार्डनमध्ये दरवर्षी मे महिन्यात उद्भूत फुल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. १८९५ पासून हा महोत्सव सुरु आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात वेगवेगळे कार्यकम आयोजित केले जातात.
आंतरराष्ट्रीय फुल महोत्सव
इशान्य भारतातलं सौंदर्य काही आगळंच! सिक्कीमची राजधानी असजेल्या गंगटोकमध्ये होणाऱ्या फुलमहोत्सवाचा आपण चुकवूच शकत नाही. मार्च आणि एप्रील महिन्यात उगवणाऱ्या हजारो- लाखो दूर्मिळ फुलांचा मनमोहक देखाव्याचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता.तुम्ही ऑर्किडच्या 600 हून अधिक दुर्मिळ प्रजाती आणि रोडोडेंड्रॉनच्या 50 हून अधिक प्रजातींचे साक्षीदार होऊ शकता.
या व्यतिरिक्त, या फ्लॉवर फेस्टिव्हलची इतर आकर्षणे म्हणजे गुलाब, ग्लॅडिओली, फर्नच्या विविध प्रजाती, औषधी वनस्पती, कॅक्टी, लता, गिर्यारोहक इत्यादी. सणासुदीला अधिक रमणीय बनवण्यासाठी, फूड फेस्टिव्हलचेही आयोजन केले जाते जेथे तुम्ही स्थानिक पदार्थ तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
महाराष्ट्राच्या कास पठारावरचा नजारा काही औरच!
महाराष्ट्रातील कास पठार हे ८५० हून अधिक फुलांच्या प्रजातींचं घर आहे. युनेस्कोचे ते जागतिक वारसास्थळही आहे. फुलांच्या भूमीचं हे अनोखं सौंदर्य न्याहाळण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम आहे. पावसाळ्यानंतर सुरु होणारी ही शेकडो रंगांची उधळण कास पठारावरच्या दरीत विलक्षण दिसते.