Join us

Farm Produce Got a Rightful Market : शेतमालाला मिळाली हक्काची बाजारपेठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 9:25 AM

Farm produce got a rightful market: तरंग मेळाव्याच्या माध्यमातून शेतमालाला मिळाली बाजारपेठ. ४० हून अधिक कृषी उत्पादक कंपन्यांचा सहभाग.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयार केलेल्या मालाची मार्केटिंग व्हावी आणि त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी आयोजित तीन दिवसीय विक्री 'तरंग' मेळाव्याला २७ जुलैपासून छत्रपती संभाजीनर येथील पाटीदार भवन येथे सुरुवात झाली आहे.

या प्रदर्शनात ४० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदीप पराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक विवेक तायडे, ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक डी. एम. कावेरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांची यावेळी उपस्थित होती.

या प्रदर्शनात मराठवाड्यातील ४० कृषी उत्पादक कंपन्यांनी त्यांचे स्टॉल मांडले आहेत. 

ज्यात स्टॉलवर हळद, गहू, तांदूळ, तूर, ज्वारी, तसेच मध, मिरची पावडर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. वर्मी कंपोस्ट खताचाही एक स्टॉल आहे. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक मंडळांसाठी तीन दिवस चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता केवळ पारंपरिक व्यवसाय न करता अन्न प्रक्रिया उद्योग करावा, असे मान्यवरांनी सांगितले. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले.

दोन दिवस प्रदर्शन• शनिवारी सुरू झालेल्या प्रदर्शनाला रविवारी आणि सोमवारीही नागरिकांना भेट देता येणार आहे. • रोज लागणाऱ्या वस्तू येथे उपलब्ध आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमार्केट यार्ड