बीड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. गुरुवारी बीड जिल्ह्याचे तापमान ३८ अंश होते. भर उन्हात काम केल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे उन्हात राबणाऱ्या कष्टकऱ्यांनो, आपले आरोग्य सांभाळा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शेतीतील काही अंशी कामे आटोपली असली तरीही अनेक शेतकरी सध्या देखील कपाशीच्या पर्हाट्या, शेतीतील काडी कचरा आदी अवशेष जमा करण्याचे काम करतांना दिसून येत आहे. शा वेळी शेतकरी बांधवांनी आपापले आरोग्य सांभाळावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
वाढत्या उकाड्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक उन्हात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. अशा स्थितीतही अनेक बांधकाम कामगार, शेतमजूर, शेतकरी व इतर कष्टकरी वर्ग भर उन्हातही काम करीत असल्याचे निदर्शनास येते.
रखरखत्या उन्हात काम करण्याची गरज भासल्यास कामगारांनी वारंवार पाणी प्यावे, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत काम करणे टाळावे, ताक, लिंबू पाणी असे द्रव्य पदार्थ घ्यावे. अनवाणी काम करू नये, यासह इतर उपायांचा अवलंब करावा, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
३८ अंशांवर पोहोचला पारा
उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. ४ एप्रिल रोजी वडवणी तालुक्याचे कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचले होते. यातही हळूहळू वाढ होत आहे.
ही लक्षणे दिसताच घ्या उपचार
प्रौढांच्या शरीराचे तापमान ४० अंशावर (१०४ फॅरेनहिट) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुस्वी, स्नायूंचे अखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कामगारांनी काय काळजी घ्यावी ?
उन्हात काम करताना हलक्या रंगाचे, पातळ सैल, सुती कपडे परिधान करावेत. कामगारांनी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे.
बाहेरील व कठोर कामे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावीत. दर एक तासाने किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी.
गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्यांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अति परिश्रमाची कामे भर उन्हात करू नये, डोक्यावर रुमाल बांधून ठेवावा.
कामगारांसाठी मालकांनी सुविधा द्याव्यात
कामाच्या ठिकाणी मालकांनी कामगारांसाठी गार पाण्याची सोय करावी. कामगारांना कामाच्या ठिकाणी उन्हापासून बचावासाठी शेडची सोय करावी.