अशोक निमोणकर
जामखेड : तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्याने जामखेड कृषी विभाग व महाबीज आत्मा अंतर्गत घेतलेल्या उडिदाला लागलेल्या शेंगा ह्या केसाळ झाल्या आहेत. शेंगातही लाल, केसरी रंगाचे पोकळ दाणे निघाल्यामुळे बचतगटातील २५ शेतकऱ्यांच्या १२५ एकरावरील उडीद वाया गेले आहे.
याबाबत शेतकरी बापूसाहेब शिंदे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोन करून थेट तक्रार केली. त्याची दखल घेऊन महाबीज अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश दिले.
त्यानंतर अहमदनगरचे महाबीज जिल्हा व्यवस्थापक शहाजी दौंड व विठ्ठल काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी पाहणी करून पंचनामे केले. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली असल्याने शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सदर पथकाकडे केली आहे.
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील राजमाता कृषी बचत गट, श्री दत्तकृपा बचत गट, घुनेश्वर बचत गट, हनुमान कृषी बचत गट व आणखी तीन बचत गटांना कृषी सहायक शीतल चिनके यांच्या हस्ते उडिदाचे महाबीज हे बियाणे वाटप केले होते.
बचतगटातील २५ शेतकऱ्यांनी पाच एकराच्या प्लॉटमध्ये उडीद पेरला होता. सततच्या पावसाने सदर उडिदाची वाढ खुंटलेली होती.
शेंगाच्या अवस्थेत आल्यानंतर त्यामध्ये लाल व केसरी व एकदम कमकुवत अशा स्वरूपाचे दाणे होते. त्यामुळे शेतकरी बापूसाहेब शिंदे यांनी जामखेड कृषी कार्यालयाला तक्रार केली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
अखेर शिंदे यांनी शुक्रवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना थेट मोबाइलवरून आपली कैफियत सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली.
महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक शहाजी दौंड, उपव्यवस्थापक विठ्ठल काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी पिंपरखेड येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तत्काळ पंचनामे केले.
बियाणे हे महाबीज बियाणे कंपनीचे होते. नवीन वाण केसाळ असलेल्या शेंगाचा आहे. ऊन कमी असल्याने दाणे चांगले भरले नाही. सदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता येत नाही. त्यामुळे त्यांना ग्राहक मंचात दावा दाखल करावा लागेल. - रवींद्र घुले, तालुका कृषी अधिकारी जामखेड
पिंपरखेड येथील २५ शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच एकर प्लॉटमध्ये महाबीज उडिदाची लागवड केली. पण शेंगा येण्याच्या अवस्थेत केसाळ शेंगा व त्यामधील दाणे लाल, केसरी कमकुवत असल्याने तक्रार याबाबत कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली. महाबीज अधिकाऱ्यांचा निष्कर्ष काहीही असला तरी आमचे उडीद पीक वाया गेले. सध्या आठ हजार रुपये क्विंटल उडिदाला भाव आहे. त्यामुळे महाबीज कंपनीवर कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना महाबीज कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. - बापूसाहेब शिंदे, शेतकरी