Join us

शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 7:54 PM

तपासणीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक : रुग्णांचे प्रमाण वाढले

ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार जडले आहेत, त्यांच्यावर भविष्यात किडनी निकामी होण्याचे संकट देखील उद्भवू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

अनेक शेतकरी बांधव कामाच्या व्यापात अचानक भूक मंदावणे, थकवा जाणवणे, कोरडेपणा येऊन खाज सुटणे, गुडघा आणि पोटऱ्यांना सूज येणे आदी स्वरूपातील लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही लक्षणे धोकादायक असून असा त्रास जाणवल्यास किडनीची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

काही कारणास्तव झालेली दुखापत, उच्च रक्तदाब, मधुमेह जडलेल्या रुग्णांची किडनी देखील खराब होऊ शकते. अशावेळी शरीरातील विषारी पदार्थ 'फिल्टर' होऊ शकत नाही. ज्यामुळे वेळप्रसंगी किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.

किडनी शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ती प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला 'फिल्टर' करण्याचे काम करते. हे सर्व विषारी पदार्थ मूत्राशयात जातात आणि लघवीवाटे बाहेर पडतात.

तथापि, अनेकजण विविध प्रकारच्या किडनी आजारांनी ग्रस्त असतात; मात्र बहुतांश रुग्णांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कालांतराने मात्र मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ ओढवते. त्यामुळे किडनीच्या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणून देखील संबोधले जाते. नागरिकांनी या आजाराचे लक्षणे आढळल्या वेळीच उपचार करण्याची गरज आहे.

लक्षणे असतात सौम्य; पण परिणाम घातक !

'किडनी फेल्युअर'ची लक्षणे अत्यंत सौम्य असतात. हा आजार जोपर्यंत अधिक प्रमाणात बळावत नाही, तोपर्यंत बहुतेक लोकांना शरीरात काही फरक झाल्याची देखील जाणीव होत नाही; मात्र भविष्यात परिणाम अत्यंत घातक होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही आहेत किडनी रोगाची लक्षणे !

शरीरावर सूज : किडनी जेव्हा योग्यरीत्या काम करणे थांबविते, तेव्हा शरीरात सोडियम जमा होते. ज्यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव गुडघा, पोटऱ्यांना सूज येते.

मळमळ, उलटी : शरीरात अधिक प्रमाणात विषारी घटक जमा झाल्यास भूक मंदावते. सकाळच्या सुमारास मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवतो.

शरीराला सुटते खाज : त्वचा कोरडी पडून खाज सुटणे हे किडनी विकाराचे मुख्य लक्षण समजले जाते. विषारी पदार्थ रक्तात जमा झाल्यानंतर खाज सुटत असते.

हेही वाचा - शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे

टॅग्स :शेतकरीहेल्थ टिप्सआरोग्य