नितीन कांबळे
शेती पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी स्वतः सोबत पिकाची देखील काळजी घ्यायला हवी. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. पिकांवर फवारणी करताना गोमूत्र, दशपर्णी, निंबोळी अर्क याची फवारणी सर्व पिकांवर करावी. पिकांवर शक्यतो कीटकनाशक फवारणी करूच नये.
कीटकनाशक फवारणी 'या' पिकांवर नको
■ शेतातील कोणत्याच पिकांवर कीटकनाशक फवारणी करायला नको असते. तरीही फवारणी करतांना अन्नधान्य पिके टाळावीत.
■ मात्र, आपल्याकडे कीड व रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला की शेतकरी फवारणी करतात.
■ फवारणी केल्याने पिकांवर कीटकनाशकाचा अंश राहतो. तो आरोग्यासाठी घातक ठरतो. त्यामुळे शक्यतो कोणत्याच पिकांवर फवारणी नको.
निंबोळी अर्काची फवारणी करा
शेतातील पिकांवर औषधाची फवारणी करताना घरगुती उपाय वापरावेत. त्याचबरोबर निंबोळी अर्क एकत्र करून पिकांवर फवारणी करावी. सुरुवातीच्या टप्प्यात पिके आली तर फवारणीची गरज भासत नाही. पण सुरुवातीपासूनच जर गोमूत्र, दशपर्णी, निंबोळी अर्क याची फवारणी केल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव जाणवणार नाही, असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले.
फवारणी करताना काय काळजी घ्याल?
■ एकच कीटकनाशक दोनपेक्षा जास्त वेळा नको : एकच कीटकनाशक दोनदा फवारणी केल्यास त्याच्यात हवी तेवढी प्रतिकारशक्ती राहत नसल्याने पिकांवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन कीटकनाशक घेऊन फवारणी करावी.
■ पीक कोणत्या अवस्थेत असल्यानंतर फवारणी करावी : फवारणी करताना पीक पेरणीच्या नंतर दुसऱ्या टप्प्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने व कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी.
■ सुरक्षेची काळजी आवश्यक : तणनाशके फवारणीचा पंप चुकून ही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.
■ एकात्मिक कीड व्यवस्थापन : प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवली जाते. या व्यवस्थापन तंत्रामध्ये तांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, आनुवंशिक पर्यावरण पद्धतीचा वापर केला जातो.
हेही वाचा - आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य