अलीकडे पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे मुतखड्याचे प्रमाण वाढत आहे. मुतखडा तयार होण्यास अनेक कारणे असली तरी पाणी कमी पिण्याने मुतखडा होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले.
अनेक शेतकरी बांधव कामाच्या नादात अनेकदा केवळ जेवण्याच्या वेळी पाणी पितात त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना मूतखडयाचा धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकर्यांनी काम करतांना दर तासाला थोडे फार पाणी पित राहण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
जीवनशैलीत होणारे बदल, आहार आणि व्यायामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. कमी पाणी पिण्यामुळे मुतखड्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. अति शारीरिक श्रम किंवा अति व्यायाम या कारणांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आनुवंशिकता, सततच्या मूत्रपिंडाचे संक्रमण, मधुमेही लोकांमध्ये शुगर प्रमाणापेक्षा सतत जास्तीचे राहणे यामुळेदेखील मुतखडा होऊ शकतो.
विशिष्ट प्रकारचा आहार, गरजेपेक्षा जास्त वजन, काही शारीरिक विकार, एखाद्या विशिष्ट रोगावर घेतली जाणारी औषधे, तसेच सप्लिमेंट्स ही किडनी स्टोन्स होण्यामागची कारणे मानली जातात. मूत्रमार्गात होणाऱ्या जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते, वेदना निर्माण होतात. मुतखड्याशी संबंधित लक्षणे दिसून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुतखड्याची लक्षणे काय?
• ओटीपोटात आणि जननेंद्रियाजवळ वेदना, उलटी येणे, मळमळ होणे
• एकावेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे
• मूत्र विसर्जन करताना वेदना किवा जळजळ होणे
• लघवीला उग्र वास येणे, बसल्यावर वेदना होणे
• जंतू संसर्ग असेल तर थंडी व ताप, कधी-कधी लघवीतून रक्त जाणे,
• काही वेळेला लघवी होणे बंद होणे
काय काळजी घ्याल?
• दिवसातून कमीत-कमी साडेतीन ते पाच लिटर पाणी प्यावे.
• आहारात पातळ पदार्थांचा समावेश करावा, लघवी तुंबवून न ठेवणे
• काढलेला स्टोन कुठल्या प्रकारचा आहे ते जाणून पथ्ये पाळावीत.
• आहारात अति प्रमाणात मीठ, साखर घेऊ नये.
घाम आणि युरिनच्या माध्यमातून शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात. मुतखडा झाल्यास डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्यावीत. सकस आहार, नियमित व्यायाम करावा. उन्हाच्या दिवसात पोटभर पाणी प्यावे. - डॉ. सुरज कोठावळे, जड वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
गेवराई तालुक्यात मुतखडा आजाराचे रुग्ण वाढले आहेत. अनेकजण पाणी कमी पितात. त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. आहारात पातळ पदार्थ कमी घेणे, लघवी थांबवून ठेवणे, विहिरीतील पाण्यामुळेही मुतखडा होतो. - डॉ. महंमद नोमाणी, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई